होमपेज › Ahamadnagar › सेवा सोसायट्यांना ‘मायक्रो एटीएम’

सेवा सोसायट्यांना ‘मायक्रो एटीएम’

Published On: Sep 08 2018 1:31AM | Last Updated: Sep 08 2018 1:31AMनगर : प्रतिनिधी

जिल्हा बँकेने ग्राहकांना रूपे डेबिट कार्ड व किसान क्रेडिट कार्ड दिले आहे. त्याच्या वापरासाठी जिल्ह्यात 45 एटीएम कार्यरत केले आहेत. सभासद व शेतकर्‍यांना वापर सुलभ व्हावा यासाठी जिल्ह्यातल्या 500 सेवा सोसायट्यांना मायक्रो एटीएम देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा बँकेचे अध्यक्ष सीताराम गायकर यांनी दिली. गेल्या आर्थिक वर्षात बँकेला 35 कोटींचा नफा झाला असून, भागधारकांना 9 टक्के प्रमाणे 19 कोटींचा लाभांश देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

बँकेची 61 वी वार्षिक सर्वसाधारण सभा बँकेच्या यशवंतराव चव्हाण सहकार सभागृहात झाली. अध्यक्षीय भाषणात गायकर बोलत होते. यावेळी बँकेचे उपाध्यक्ष रामदास वाघ, आ. वैभव पिचड, उदय शेळके, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के, दत्तात्रय पानसरे, रावसाहेब शेळके, बाजीराव खेमनर, मीनाक्षी साळुंके, पांडुरंग अभंग, अंबादास पिसाळ, चैताली काळे, जगन्नाथ राळेभात, राजेंद्र नागवडे, मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वर्पे आदींसह जिल्हाभरातील सेवा सोसायट्या, संस्थांचे अधिकारी, प्रतिनिधी उपस्थित होते.

गायकर म्हणाले की, 31 मार्च 2018 अखेर बँकेचे 4 हजार 76 कोटी रुपयांचे कर्ज येणे बाकी आहे. 1 हजार 52 कोटींच्या अल्पमुदत पीक कर्जाचे वाटप केले असून, त्याचे 1 हजार 556 कोटी रुपये येणे बाकी आहे. साखर कारखान्यांसह सर्व प्रकारचे कॅश क्रेडिट, वैयक्तिक कर्जे व सोने तारण कर्जे यासाठी एकूण 1 हजार 642 कोटी रुपये येणे बाकी आहेत. यात साखर कारखान्यांना 1 हजार 389 कोटींचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. जिल्हा बँकेशी संलग्न असलेल्या बचत गटांना 5 कोटी 68 लाखांचे कर्ज गेल्या वर्षात देण्यात आले असून, सर्व बचत गटांकडे 11 कोटींची बाकी आहे. गेल्या वर्षीच्या खरीप व रब्बी हंगामात 1 लाख 20 हजार 621 कर्जदार भासद शेतकर्‍यांचा 50 टक्के पीक विमा हप्ता बँकेने भरला.30 जून 2017 रोजी बँकेची कर्ज वसुली 42 टक्के होती चालू वर्षी अवघी 56 टक्के वसुली झाली असल्याचे ते म्हणाले.

नव्याने येत असलेल्या भूजल कायद्याने स्वतःच्या विहिरीतील पाणी वापरण्यासाठी शेतकर्‍यांना कर भरावा लागणार आहे. त्यामुळे या कायद्याला विरोध करण्याचा ठराव घेण्याची मागणी माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के यांनी केली. तसा ठराव घेण्यात आला. जिल्हा माध्यमिक शिक्षक सोसायटीला जिल्हा बँक 17 टक्के दराने कर्ज देते. इतर बँका कमी दराने कर्ज देण्यास तयार आहेत. त्यामुळे जिल्हा बँकेने व्याजदर कमी करावा. अन्यथा पुढील दोन वर्षानंतर सोसायटीला बँकेची गरज राहणार नसल्याचा इशारा सोसायटीचे संचालक भाऊसाहेब कचरे यांनी दिला.

सचिवांना कर्जमाफीचा पगार का नाही?

सेवा संस्थेच्या सचिवांनी दिवसरात्र राबत कर्जमाफीचे काम केले. बँकेने बँकेच्या अधिकार्‍यांना कर्जमाफीच्या कामाचा पगार दिला असतांना सचिवांनाही पगार देण्याची मागणी शिवाजी वाळुंज यांनी केली. कर्जमाफीने बँकेला नफा झाला असून, त्यातून पगार देणे शक्य असल्याचे ते म्हणाले. सोसायट्यांच्या जीवावर बँकेचे संचालक निवडून येत असतांना सोसायट्यांकडे दुर्लक्ष का होत आहे? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. कर्मचार्‍यांच्या पदोन्नतीची कारवाई करण्याची मागणी अशोक गायकवाड यांनी केली.

व्याजदर सवलतीत केली कपात

विविध कार्यकारी संस्थांच्या सभासदांना माध्यम व दीर्घ मुदत कर्ज नियमित फेडल्यास गेल्या वर्षी 2 टक्के व्याजदर सवलत देण्यात येत होती. यावर्षी त्यात 1 टक्के कपात करण्यात आली आहे. सहकारी साखर कारखान्यांना सवलतीची व एनपीए झालेली कर्ज खाती सोडून गेल्या वर्षी 1.50 टक्के व्याजदर सवलत होती. त्यात 0.50 टक्के कपात करण्यात आली. नियमित कर्ज परतफेड करणार्‍या व थकबाकी नसणार्‍या पगारदार नोकर संस्था, खरेदी विक्री संघ, जिनिंग प्रेस संस्थांना 1 टक्के. बीपीएल बचत गटांना 3 व एपीएल बचत गटांना 7 टक्के व्याजदर सवलत देण्याचा ठराव घेण्यात आला.