Wed, Jul 15, 2020 16:00होमपेज › Ahamadnagar › राहुरी-पारनेरच्या सेतूला मिळेना मुहूर्त

राहुरी-पारनेरच्या सेतूला मिळेना मुहूर्त

Published On: Dec 06 2017 1:46AM | Last Updated: Dec 06 2017 1:04AM

बुकमार्क करा

म्हैसगाव : वार्ताहर

राहुरी व पारनेर तालुक्यांतील नागरिक गेली 45 वर्षे बोटीत बसून मुळा धरणाच्या जलाशयातून जीवघेणा प्रवास करत होते, तो अखेर आता कायमचा संपला असल्याने प्रवासी समाधानी झाले आहेत. दरम्यान, कोट्यवधी रुपये खर्चून उभारलेल्या पुलाच्या उद्घाटनाला मुहूर्त मिळत नसल्याने हतबल नागरिकांनी काल लोकवर्गणीतून हा पूल रहदारीस खुला केला आहे. मुळा नदीवर मागील वर्षी पालकमंत्र्यांच्या हस्ते या पुलाचे भूमिपूजन झाले होते. एक वर्षातच हा पूल पूर्ण होऊन दोन्ही तालुक्यांच्या नागरिकांना मोठा आनंद झाला. मात्र, हा पूल पूर्ण होऊन अद्यापि उद्घाटनाच्या प्रतिक्षेत आहे. पुढील काही दिवसांतच या पुलाचे लोकार्पण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती आ. शिवाजी कर्डिले यांनी दिली होती.

पाच कोटी खर्चून हा पूल आज उभा राहिला आहे, पण ज्या बोटीतून अनेकांनी गेली पन्नास वर्षे प्रवास केला, ती बोट आता भूतकाळात जमा होत आहे. कारण हा जीवघेणा प्रवास आता कायमचा थांबला आहे. म्हैसगावच्या बाजूने काम पूर्ण झाले आहे. परंतु पारनेरकडील तास वनकुटेच्या बाजूने एक मोठा खड्डा होता. त्यामुळे साधी मोटारसायकल देखील पुलावरून येत नव्हती. त्यामुळे ठेकेदाराचा विरोध झुगारून पारनेर हद्दीतील नागरिकांनी लोक वर्गणी जमा करून जेसीबीने रस्ता करून पूल वाहतुकीस खुला केला आहे. या परिसरातील नागरिकांना कायमच

 राहुरी मार्केट अथवा आठवडे बाजारासाठी म्हैसगावला यावे लागते. त्यामुळे उद्घाटनाची वाट पाहत बसण्यापेक्षा लोकांनी पदरमोड करून पूल वाहतुकीस खुला केला आहे. राजकीय श्रेयवादात या पुलाचा शुभारंभ अडकतो की काय? अशीच भीती येथील नागरिकांना होती. पण सध्यातरी लोकांच्या सोयीसाठी उभारलेला आंग्रेवाडी-तास हा पूल लोकांनीच कुठल्याही पुढार्‍याविना वाहतुकीस खुला केला आहे.