Tue, Apr 23, 2019 07:43होमपेज › Ahamadnagar › खासदार असूनही मला टँकरने पाणी!

खासदार असूनही मला टँकरने पाणी!

Published On: Apr 18 2018 1:43AM | Last Updated: Apr 18 2018 12:12AMनगर : प्रतिनिधी

महापालिका दर महिन्याला टँकरवर 9 लाखांचा खर्च करते. अनेकांना पाणीपुरवठा होत नाही. बेकायदेशीर नळ कनेक्शनवर कारवाई होत नाही. मी स्वतः खासदार असताना आम्हाला आठआठ दिवस पाणी मिळत नाही. पालिकेला फोन करून पाण्याचा टँकर मागवावा लागतो, अशी खंत खा. दिलीप गांधी यांनी व्यक्त केली. वारंवार निर्देश देऊनही अधिकारी काम करत नसल्याने गांधी हतबल झाल्याचे दिसून आले. अखेर नेहमीच्या शैलीत अधिकार्‍यांना चौकशीचा धाक दाखविण्याची वेळ त्यांच्यावर आली.

जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या दिशा समितीची बैठक खा. दिलीप गांधी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषदेच्या सभागृहात झाली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजित माने, अपर जिल्हाधिकारी भानुदास पालवे, मनपा आयुक्त घनशाम मंगळे आदी उपस्थित होते.

सभेच्या सुरुवातीला मागील सभेच्या इतिवृत्ताचे वाचन करण्यात आले. मागील सभेत उपस्थित केलेल्या अनेक प्रश्नांवर अजूनही योग्य कारवाई झालेली नसल्याने खा. गांधी यांनी नाराजी व्यक्त केली. महावितरण शहरात भूमिगत वीजवाहिन्या टाकत आहे. मात्र त्यासाठी काही भागात रस्ते खोदण्याची परवानगी मिळत नसल्याची तक्रार महावितरणच्या अधिकार्‍यांनी सभेत केली. त्यासाठी भरावे लागणारे पैसे मनपाने थकबाकीतून वजा करण्याची मागणी महावितरणच्या अधिकार्‍यांनी केली. त्याला आयुक्त मंगळे यांनी सहमती दर्शवत दोन दिवसात मंजुरी देण्याचे आश्वासन दिले. दोन दिवसांत नाही, तर उद्याच्या उद्या याला मंजुरी द्या. योजनेसाठी केंद्र सरकारचे पैसे आहेत. याबाबत पदाधिकार्‍यांशी चर्चा करू नका, असेही गांधींनी मंगळे यांना बजावले.

जिल्ह्यातील 89 पाणीपुरवठा योजनांसाठी 32 कोटी रुपये निधी मिळाला आहे. ह्या निधीतून करावयाच्या कामांचे प्रस्ताव तयार करून लवकरात लवकर कामे सुरु करण्याचे नियोजन करावे. केंद्र सरकारचा निधी असल्याने यात हयगय करू नये. चुकीचे काम केल्यास अधिकार्‍यांची चौकशी लावण्याचा इशाराही गांधींनी दिला.

 

Tags : ahamadnagar, ahamadnagar news, Rural Development Authority Direction Committee, Meeting,