Thu, Mar 21, 2019 15:38होमपेज › Ahamadnagar › सकल मराठा क्रांती मोर्चाची उद्या बैठक

सकल मराठा क्रांती मोर्चाची उद्या बैठक

Published On: Apr 25 2018 12:55AM | Last Updated: Apr 24 2018 11:11PMनगर : प्रतिनिधी

नगरला मराठा आरक्षणाबाबत 2 मे रोजी राज्य मागासवर्गीय आयोगाच्यावतीने जनसुनावणी घेण्यात येणार आहे. त्याच्या नियोजनासाठी गुरुवारी (दि. 26) शासकीय विश्रामगृहावर जिल्हा सकल मराठा समाज-मराठा क्रांती मोर्चाची अतिशय महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती  राज्य समन्वयक तथा शिवप्रहारचे संस्थापक संजीव भोर यांनी दिली आहे. या बैठकीसाठी मराठा समाज हितास्तव कार्यरत व्यक्ती,संस्था, संघटना, अभ्यासक व सर्व क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी,समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. मराठा आरक्षणाबाबत उच्च न्यायालयात खटला प्रलंबित आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मराठा समाजाबाबत डाटा पडताळणीसाठी व त्यानुसार अहवाल सादर करण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगास उच्च न्यायालयाकडून सूचित करण्यात आले आहे. त्यानुसार राज्य मागासवर्ग आयोग सर्व जिल्ह्यांमध्ये मराठा आरक्षणाबाबत सर्वेक्षण करून अहवाल सादर करणार आहे.

जोपर्यंत राज्य मागासवर्ग आयोगाकडून डाटा पडताळणी व सर्वेक्षण अहवाल उच्च न्यायालयात सादर होत नाही, तोपर्यंत मराठा आरक्षणाचा गाडा पुढे जाणार नाही. 2 मे 2018 रोजी मराठा आरक्षणाबाबत राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य डॉ. सर्जेराव निमसे व बालसराफ जनसुनावणीसाठी अहमदनगर येथे मुख्य शासकीय विश्रामगृह येथे उपस्थित राहणार आहेत. या सुनावणीदरम्यान मराठा समाजातील व्यक्ती, संस्था, संघटना, अभ्यासक, विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या समाजबांधवांकडून मराठा समाज आरक्षणास कसा पात्र आहे, याबाबत अभ्यासपूर्ण निवेदने मोठ्या प्रमाणात सादर होणे अत्यंत आवश्यक आहे. आयोगाचा अहवाल सकारात्मक असणे हा आरक्षण मिळविण्यासाठी अतिशय महत्त्वाचा टप्पा आहे. प्रत्येक तालुक्यातून संदर्भ व पुराव्यांसह सविस्तर अभ्यासात्मक निवेदने आयोगाला दिली जावीत,  यासाठी नियोजनासाठी ही बैठक आयोजित करण्यात आलेली आहे.

Tags : Ahmadnagar, Meeting, Sakal Maratha Morcha, tomorrow