Tue, May 21, 2019 22:58होमपेज › Ahamadnagar › अंत्यसंस्कारात पतीवर हल्ला

अंत्यसंस्कारात पतीवर हल्ला

Published On: Feb 20 2018 1:21AM | Last Updated: Feb 20 2018 12:19AMमाळवाडगाव : वार्ताहर

श्रीरामपूर तालुक्यातील माळवाडगाव येथील नवविवाहिता आत्महत्या प्रकरणातील विवाहितेवर काल तिसर्‍या दिवशी प्रचंड पोलिस बंदोबस्तात अंत्यसंस्कार सुरू असतानाच मृत अनिताचा पती जालिंदर याने अग्निडाग देऊन खांद्यावरील मडके फोडताच माहेरच्या महिला, पुरुष नातेवाईकांनी त्याच्यावर हल्ला चढविला. त्यामुळे एकच गोंधळ होऊन आरडाओरड, पळापळ सुरू झाली. 

माळवाडगाव येथील राहत्या घरात स्कार्फने गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या नवविवाहिता अनुश्री उर्फ अनिता जालिंदर आसने हिच्या मृत्यूबाबत माहेरच्या मंडळींनी सासरच्या लोकांवर हा आत्महत्येचा प्रकार नसून घातपाताचा प्रकार असल्याची तक्रार करुन खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केल्याने शवविच्छेदनास दोन दिवस उशिर झाला होता.

श्रीरामपूर, नगर, औरंगाबाद असा प्रवास करून रुग्णवाहिका काल सोमवार दुपारी माळवाडगाव स्मशानभूमीत दाखल झाली. दोन्हीकडील नातेवाईकांसह हजारो  ग्रामस्थांनी अंत्यविधीस गर्दी केली होती. पोलिस बंदोबस्त व तणावाखालील परिस्थितीत माहेरच्या नातेवाईकांच्या इच्छेप्रमाणे अंत्यविधीचे सोपस्कर करण्यात आले. उपस्थितांसह बंदोबस्त असणार्‍या पोलिसांनाही वाटले आता शांततेत विधी पार पडतो आहे. मृत नवविवाहितेच्या पतीने तीन फेर्‍या पुर्ण करुन मडके अग्नीवर फोडताच नवविवाहीतेच्या मावशीने व दोन तरुणांनी पती जालिंदरवर हल्ला चढवून मारहाण करण्यास सुरुवात केली. 

हा प्रकार पाहून मुलीच्या उपस्थितीत नातेवाईकांनी तिरडीच्या माडाचे बांबू मारहाणीसाठी उपसले. परिस्थिती आवाक्याच्या बाहेर जात असताना हजर असलेले नातेवाईक, ग्रामस्थांनी स्मशानभूमीच्या बाहेर पळ काढण्यास सुरवात केली. प्रचंड गोंधळ, आरडाओरड सुरू असतानाही पो.नि. वसंत पथवे यांनी परिस्थिती नियंत्रणात आणून सर्वांना शांत केले. प्रथम मृत नवविवाहितेचा पती जालिंदर आसने, सासरा शिवाजी व सासू उषा आसने यांना खबरदारीचा उपाय म्हणून पुन्हा श्रीरामपूर तालुका पोलिस स्टेशनला आणण्यात आले. माहेरकडील नातेवाईकांना पोलिस बंदोबस्तात गावाबाहेर सोडण्यात आले.