Thu, Apr 25, 2019 07:36होमपेज › Ahamadnagar › बाजार समितीकडून स्वच्छतेला हरताळ

बाजार समितीकडून स्वच्छतेला हरताळ

Published On: Apr 23 2018 1:13AM | Last Updated: Apr 23 2018 12:48AMश्रीरामपूर : प्रतिनिधी

बाजार समिती व्यवस्थापनाच्या उदासीनतेमुळे श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा शेतकरी सभागृह परिसर घाणीच्या विळख्यात सापडला आहे. याठिकाणी कचरा, भाजीपा अवशेष सडल्याने दुर्गंधी सुटली आहे. त्यामुळे भारतभर राबविल्या जाणार्‍या स्वच्छता अभियानालाच बाजार समितीकडून हरताळ फासला जात असल्याचे निदर्शनास येत आहे. 

जिल्ह्यात श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा नावलौकिक आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीने लाखे रुपये खर्च करून शेतकरी सभागृहाची उभारणी केलेली आहे. तसेच शेजारी पत्र्याचे शेडही आहे. मात्र या परिसराकडे सध्या बाजार समिती व्यवस्थापनाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे याठिकाणी कचर्‍याचे ढिग, भाजीपाला व फळांचे अवशेष साचून सडल्याने दुर्गंधी सुटली आहे. तसेच सभागृहाच्या प्रवेशद्वारासमोरच नाशवंत फळे, भाजीपाला टाकण्यात येत असल्याने येथे उकिरड्याचे स्वरुप आले आहे. तरी देखील स्वच्छता करण्यात येत नसल्याने बाजार समितीच्या कार्यक्षमतेविषयी संताप व्यक्त केला जात आहे.

बाजार समिती परिसराची स्वच्छता करण्यासाठी स्वतंत्र कामगारांची नेमणूक करण्यात आलेली आहे. असे असतानाही संबंधित अधिकार्‍यांच्या दुर्लक्षामुळे सफाई कामात दिरंगाई केली जात आहे. त्यामुळे हा परिसर घाणीच्या विळख्यात सापडला आहे.  शेतकरी सभागृहात विविध कार्यक्रमांचे, सभांचे, शेतकरी बैठकीचे आयोजन केले जाते. अशा वेळी या दुर्गंधीचा नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. एकीकडे स्वच्छ भारत अभियानांतर्गत शासन लाखो रुपये खर्च करुन स्वच्छतेसाठी विविध उपक्रमांतून जनजागृती करत आहे. असे असताना खुद्द कृषि उत्पन्न बाजार समितीलाच स्वच्छतेचा विसर पडल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. 

श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समिती व्यवस्थापनाने परिसरातील स्वच्छता प्रश्‍नाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी शेतकर्‍यांसह व्यापार्‍यांमधून होत आहे. 

 

Tags : Shrirampur, Shrirampur news, Market Committee, Cleanliness,