Wed, Nov 21, 2018 10:11



होमपेज › Ahamadnagar › बाजार समितीला मनपाचा दणका!

बाजार समितीला मनपाचा दणका!

Published On: Jul 13 2018 12:47AM | Last Updated: Jul 12 2018 11:01PM



नगर : प्रतिनिधी

कृषि उत्पन्न बाजार समितीच्या भाजीपाला मार्केटच्या आवारातील खुल्या जागेत बांधण्यात आलेल्या 28 गाळ्यांचे बांधकाम नियमित करण्यासाठी महापालिकेकडे सादर करण्यात आलेला प्रस्ताव नगररचना विभागाने फेटाळला आहे. खुल्या जागेतील बांधकाम शासनाच्या नियमानुसार अनुज्ञेय नाही. त्यामुळे प्रस्ताव निकाली काढण्याचे आदेश प्रभारी सहाय्यक संचालक राजेश पाटील यांनी काल (दि.12) बजावले आहेत.

नगररचना योजना क्रमांक 3 मधील अंतिम भूखंड 23 मधील 28 हजार चौरस फूट क्षेत्राच्या खुल्या जागेवर कृषि उत्पन्न बाजार समितीने तेथील 28 व्यापार्‍यांना जागेचे वाटप करुन कराराने जागा उपलब्ध करुन दिली होती. या खुल्या जागेवर बांधकामासाठी परवानी नसतांनाही पत्र्याची शेड व काही प्रमाणात पक्की बांधकामे करुन गाळे उभारण्यात आले आहेत. महापालिकेने सदर गाळ्यांना अनधिकृत बांधकामाचा दर्जा देवून त्यानुसार दंडासह कर आकारणी सुरु केली आहे. या गाळ्यांच्या वाटपात गैरव्यवहार झाल्याची व बांधकामे अनधिकृत असल्याच्या तक्रारीही झाल्या. महापालिकेकडेही अनधिकृत बांधकामाबाबत शिवसेना शहरप्रमुख दिलीप सातपुते यांनी तक्रार केली होती. त्यानंतर प्रशासनाने जागेची मोजणी करुन व प्रत्यक्ष पाहणी करुन अहवाल तयार करण्यात आला आहे. दरम्यानच्या काळात सदरची बांधकामे नियमित करण्यासाठी बाजार समितीकडून हालचाली सुरु झाल्या. मात्र, दंडासह कर भरुनही बांधकामे अधिकृत करता येत नसल्याचे मनपाने बाजार समितीच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर समितीने महापालिका प्रशासनाकडे बांधकामे नियमित करण्याचा प्रस्ताव 30 जून रोजी सादर केला होता.

नगररचना विभागाकडून या प्रस्तावाची तपासणी करण्यात आल्यानंतर सदरच्या गाळ्यांची बांधकामे खुल्या जागेत असल्याचे समोर आले. मात्र, मंजूर रेखांकनातील खुल्या जागेत बांधकाम अनुज्ञेयच नसल्याचे नगररचना विभागाने स्पष्ट केले आहे. त्यानुसार प्रभारी सहाय्यक संचालक पाटील यांनी कृषि उत्पन्न बाजार समितीचा प्रस्ताव नामंजूर करत असल्याचे आदेश काल बजावले आहेत. दरम्यान, नगररचना विभागाच्या या निर्णयामुळे सदरची बांधकामे अनधिकृत ठरली असून मनपाकडून सदरची अतिक्रमणे हटविण्याबाबत कार्यवाही केली जाण्याची शक्यता आहे.