Thu, Jun 20, 2019 01:03होमपेज › Ahamadnagar › अहवाल लवकरच शासनाकडे : सर्जेराव निमसे

अहवाल लवकरच शासनाकडे : सर्जेराव निमसे

Published On: May 03 2018 1:27AM | Last Updated: May 02 2018 11:24PMनगर : प्रतिनिधी

मराठा समाजाचे आर्थिक, शैक्षणिक आणि सामाजिक मागासलेपण जाणून घेण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगाच्या वतीने जनसुनावणी घेण्यात आली. जिल्हाभरातील विविध संस्था, संघटना, लोकप्रतिनिधी व व्यक्‍तींकडून जवळपास दहा हजारांपेक्षा अधिक निवेदने दाखल झाली असल्याचे आयोगाचे तज्ञ सदस्य डॉ. सर्जेराव निमसे यांनी सांगितले. मराठा आरक्षण अहवाल तयार करण्यासाठी आयोगाच्या वतीने मॅरेथॉन काम सुरु असून, लवकरच याबाबतचा अहवाल शासनाकडे पाठविला जाईल, असेही त्यांनी नमूद केले.

आयोगाच्या सदस्य सर्वश्री डॉ. सर्जेराव निमसे, डॉ. दत्तात्रय बाळसराफ, प्रा. राजाभाऊ करपे व सदस्य सचिव डी.डी. देशमुख यांच्या उपस्थितीत काल (दि.2) शहरात जनसुनावणी झाली. जनसुनावणीनंतर सदस्य डॉ. निमसे पत्रकारांशी बोलत होते. मराठा आरक्षणाबाबत राणे समितीने यापूर्वीच शासनाकडे अहवाल सादर केलेला आहे. या अहवालाची छाननी, मराठा समाजाची आर्थिक, शैक्षणिक व सामाजिक परिस्थितीची नव्याने माहिती घेत, अधिक व्यापक स्वरुपाचा डाटा तयार करणे तसेच शासकीय नोकरीत असलेल्या व्यक्‍तींची आकडेवारी गोळा करुन, आरक्षणाबाबतचा नवीन अहवाल तयार करण्याची जबाबदारी शासनाने आयोगावर सोपविली असल्याचे डॉ. निमसे यांनी सांगितले.

त्यानुसार मराठवाडा, विदर्भ आदी ठिकाणी जनसुनावणीचे काम पूर्ण झाले आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे, यासाठी मराठवाड्यातून जवळपास पावणेतीन लाख, विदर्भातून 15 ते 20 हजारांवर निवेदने आयोगाला प्राप्‍त झाली आहेत. नगर येथील सुनावणीत अंदाजे दहा हजारांपेक्षा अधिक निवेदने आली आहेत. जनसुनावणीचे काम पावसाळयापूर्वीच पूर्ण केले जाणार असल्याचे  त्यांनी नमूद केले.