Sat, Jul 20, 2019 23:21होमपेज › Ahamadnagar › ..अन् वाळूजची पुनरावृत्ती टळली!

..अन् वाळूजची पुनरावृत्ती टळली!

Published On: Aug 12 2018 1:00AM | Last Updated: Aug 11 2018 10:28PMनगर : प्रतिनिधी

जाळपोळ, कंपन्यांवर झालेल्या दगडफेकीच्या घटनेमुळे औरंगाबादजवळील वाळूज एमआयडीसी परिसर हादरून गेला. तेथील कंपन्यांसाठी हा काळा दिवस ठरला. नगर एमआयडीसीतही असाच हिंचाराचा कट रचून, सुमारे शंभर ते दीडशे जणांच्या जमावाने दगडफेक सुरू केली होती. मात्र, एमआयडीसी पोलिसांच्या सतर्कतेमुळे नगरमध्ये वाळूज हिंसाचाराची पुनरावृत्ती टळली.

गुरुवारी (दि. 9) मराठा समाजाचे आरक्षणासाठी महाराष्ट्र बंद व चक्काजाम आंदोलन होते. रास्तारोको आंदोलन व इतर बंदच्या ठिकाणी बंदोबस्तात पोलिस प्रशासन व्यस्त होते. याचा फायदा एमआयडीसीतील कंपन्यांवर वेगवेगळ्या कारणांतून नाराज असलेल्या कार्यकर्त्यांनी उठविण्याचे ठरविले. एमआयडीसी परिसरातील काही गावांतील युवकांनी एमआयडीसीतील कंपन्यावर दगडफेक, जाळपोळ करण्याचा कट रचला होता. त्यासाठी युवकांचा जमाव एकत्र येऊ लागला. सुमारे 100 ते 150 कार्यकर्त्यांचा जमाव नगर एमआयडीसी परिसरात हिंचाचारासाठी येणार असल्याची माहिती खबर्‍यांकडून सहाय्यक पोलिस निरीक्षक विनोद चव्हाण यांना समजली. घटनेचे गांभीर्य ओळखून त्यांनी तातडीने पोलिस मुख्यालयातील दंगल नियंत्रण पथकाला पाचारण केले. त्यापूर्वीच चव्हाण व पोलिस ठाण्यातील कर्मचारी एमआयडीसीत दाखल झाले. काही वेळातच दंगल नियंत्रण पथकही पोहोचले होते. 

जमावातील युवकांनी कंपन्यांवर दगडफेक सुरू केली. तेथे पोहोचलेल्या पोलिसांच्या नजरेत हा जमाव पडला. पोलिसांनी तातडीने बळाचा वापर करून सौम्य लाठीमार सुरू केला. पोलिसांपेक्षा जास्त संख्येने असलेल्या जमावातील काही युवकांनी पोलिसांच्या दिशेने दगडफेक सुरू केली. मात्र, पोलिसांचा आक्रमक पवित्रा पाहताच दगडफेक करणारे समाजकंटक पळून जाऊ लागले. पोलिसांनी आपल्या दिशेने येणार्‍या दगड-गोट्यांची पर्वा न करताच काही मिनिटांतच जमाव पांगविला. अवघ्या 15-20 मिनिटांत समाजकंटकांचा जमाव पांगवून परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आणण्यात पोलिसांनी यश मिळविले. 

पोलिसांनी ही परिस्थिती इतक्या व्यवस्थितपणे सांभाळली की, एमआयडीसी परिसरातील काही गावे वगळता इतरांना ही गोष्ट समजू शकली नाही. जमावाची माहिती मिळाल्यानंतर एमआयडीसी पोलिसांनी अतिरिक्त फौजफाट्याची वाट पाहून वेळ वाया घातला असता, तर कदाचित परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल असती. उपलब्ध कमी पोलिस मनुष्यबळाने व्यवस्थितरित्या जमाव पांगविला. अन्यथा औरंगाबादजवळील वाळूज एमआयडीसीप्रमाणे नगरमध्ये जाळपोळ, दगडफेक होऊन नगरच्या उद्योजकांची मोठी हानी झाली असती.