होमपेज › Ahamadnagar › सकल मराठा समाजाने केला छिंदम यांचा निषेध

सकल मराठा समाजाने केला छिंदम यांचा निषेध

Published On: Feb 17 2018 2:06AM | Last Updated: Feb 17 2018 12:37AMकर्जत : प्रतिनिधी

उपमहापौर श्रीपाद छिंदम यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वापरलेल्या अपशब्दांचा कर्जत तालुक्यात निषेध करण्यात आला. तसेच त्यांच्यावर कर्जत पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. त्यांना तात्काळ अटक करावी, अशी मागणी सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आली आहे. 

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याचे वृत्त सोशल मीडियावरून तालुक्यात पसरले. श्रीपाद छिंदम यांचा कर्जत, राशीन, मिरजगाव येथे तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला. कर्जत तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने कर्जत तहसीलदार व पोलिस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले. त्यांच्यावर कर्जत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना तातडीने अटक करण्यात यावी, अशी मागणी सकल मराठा समाजाच्या वतीने पोलिस निरीक्षक वसंत भोये यांचेकडे करण्यात आली. या बैठकीला  काँग्रेसचे नेते बाळासाहेब साळुंके, मनसेचे जिल्हाध्यक्ष सचिन पोटरे,  सकल मराठा समाजाचे समन्वयक नाना धांडे, संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष राहुल नवले, शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष संजय तोरडमल, अ‍ॅड. धनराज राणे, दादा चव्हाण, निलेश तनपुरे यांच्यासह  मान्यवर उपस्थित होते. 

उपमहापौर श्रीपाद छिंदम यांचा कर्जत शहर भारतीय जनता पक्षाच्या वतीने तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला. तसे निवेदन तहसीलदार व पोलिस निरीक्षक यांना देण्यात आले यावेळी नगराध्यक्ष नामदेव राऊत, तालुकाध्यक्ष अशोक खेडकर, शहराध्यक्ष रामदास हजारे,  शहराध्यक्ष सागर साळुंके, नगरसेवक नितीन तोरडमल, सतीश समुद्र  आदी उपस्थित होते. राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्षा मंजूषा गुंड यांनी पालकमंत्री शिंदे यांचा निषेध केला. एवढी मोठी घटना घडून पालकमंत्री नगरला आले नाही. यावरून त्यांचा बेजबाबदारपणा दिसून येतो.शिवसेनेचे नेते बळीराम यादव आणि माजी शहरप्रमुख दीपक शहाणे यांनीही निषेध केला.