Mon, Jun 17, 2019 04:10होमपेज › Ahamadnagar › श्रीगोंद्यात मराठा समाजाचा एल्गार

श्रीगोंद्यात मराठा समाजाचा एल्गार

Published On: Jul 29 2018 1:20AM | Last Updated: Jul 28 2018 11:34PMश्रीगोंदा : प्रतिनिधी 

आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी सकल मराठा समाज दिवसेंदिवस आक्रमक होताना दिसत आहे. आरक्षणाच्या मुद्यावर काल (दि.28) श्रीगोंदा शहरात मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाला हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते. यावेळी तहसीलदार महेंद्र महाजन यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. 

गेल्या दहा ते बारा दिवसांपासून मराठा समाजाचे आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे. मात्र, शासनाकडून त्याची योग्य दखल घेतली जात नसल्याने, आंदोलनाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. श्रीगोंदा तालुक्यातही रास्तारोको, बंद पाळून आरक्षणाच्या मुद्याला पाठिंबा दर्शविण्यात आला. तहसील कार्यालयावर मोर्चा नेऊन त्या ठिकाणी निवेदन देण्याचे चार दिवसांपूर्वीच निश्चित झाले होते. त्यानुसार काल हा मोर्चा काण्यात आला. या मोर्चाविषयी सोशल मीडियावर व माध्यमामधूनही माहिती प्रसारित करण्यात आली होती. 

शहरातील सिद्धेश्वर मंदिरापासून काल (दि.28) सकाळी अकरा वाजता या मोर्चाला सुरुवात झाली. ‘जय भवानी, जय शिवाजी’, ‘मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे’, अशा स्वरूपाच्या घोषणानी संपूर्ण शहर दणाणूून गेले होते.श्रीगोंदा बसस्थानक, झेंडा चौक, होनराव चौक मार्गे मोर्चा तहसील कार्यालयावर आला. तिथेही तरुणांनी घोषणांनी परिसर दुमदुमून सोडला. सृष्टी जामदार या तरूणीने मोर्चेकर्‍यांच्या मागण्या वाचून दाखविल्या. त्यानंतर प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत तहसीलदार महेंद्र महाजन यांना निवेदन देण्यात आले. दुपारी एक वाजता मोर्चाची सांगता झाली. मोर्चादरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिस निरीक्षक बाजीराव पोवार यांच्या नेतृत्वाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.