Tue, Apr 23, 2019 07:36होमपेज › Ahamadnagar › दोषी कोण? पेहचान कौन!

दोषी कोण? पेहचान कौन!

Published On: Aug 27 2018 1:12AM | Last Updated: Aug 26 2018 10:57PMनगर : गणेश शेंडगे

आमदाराचा बनावट आवाज काढून पोलिस निरीक्षकाची फसवणूक करणे, अधिकार्‍यानेही त्यास बळी पडणे, त्यानंतर दुसर्‍या दिवशी सरकारी गणवेश चोरी झाल्याची फिर्याद देणे, गंडविणार्‍याच्या पत्नीने निरीक्षकाविरुद्ध पोलिस अधीक्षकांकडे गैरवर्तनाची तक्रार करणे, पूर्वी फसवणूक झालेले आणखी तीन गुन्हे लागोपाठ दाखल होणे, यातून इसारवाडे याचे गुन्हेगारी ‘रेकॉर्ड’ तयार झाले. मात्र, त्यासोबतच पोलिस निरीक्षकाच्या वर्तनाबाबत अनेक गंभीर प्रश्‍नही निर्माण झाले आहेत.

मूळ प्रश्‍न असा की, पोलिस निरीक्षक दर्जाचा अधिकारी अशा प्रकाराला नेमक्या कोणत्या आमिषापोटी बळी पडला? फिर्यादीत फसवणुकीचे कारण काहीही असले, तरी पीआय दर्जाच्या अधिकार्‍याला कोणीतरी फसविण्याचा प्रयत्न करतो अन् अधिकारीही त्याला बळी पडतो! त्यामुळे कागदावर काही असले, तरी यामागे नक्कीच वेगळे कारण असल्याची शंका साहजिकच निर्माण होते. त्यानंतर पोलिस निरीक्षक दुसर्‍या दिवशीच आणखी एक फिर्याद देतो, त्यात सरकारी गणवेश चोरी झाल्याचा दावा केला जातो. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर एक महिला पोलिस अधीक्षकांकडे पोलिस निरीक्षकाविरुद्ध गैरवर्तनाची तक्रार करते. त्या तक्रारीत घाईगडबडीत पोलिस निरीक्षकाचा गणवेश घरी राहिल्याचा दावा केला जातो. या घडामोडींतून शिवसंग्रामचा तालुकाध्यक्ष नवनाथ इसारवाडे व पोलिस निरीक्षक गोविंद ओमासे यांच्यात चांगलेच बिनसल्याचे चव्हाट्यावर आले. त्यानंतरच पूर्वी फसवणूक झाल्याचे आणखी तीन गुन्हे लागोपाठ दाखल होतात. याचा अर्थ यापूर्वी तेथे नियुक्तीस असलेल्या प्रभारी अधिकार्‍याने त्या तक्रारींची दखल घेतली नाही की फसवणूक करणार्‍यांना अचानक जाग आली, असा प्रश्‍न निर्माण होतो. फसवणूक झाली होती, तर साहजिकच इसारवाडे याच्या फसवणुकीचे उद्योग पाठिशी घालण्याचे काम तेथील प्रभारी अधिकार्‍याकडून सुरू होते, असा अर्थ निघतो. कदाचित त्या तक्रारी खोट्या आहेत, असे म्हटले, तरी पोलिस निरीक्षकाची फसवणूक केल्याच्या प्रकारानंतरच असे गुन्हे का दाखल होतात, हा प्रश्‍न उरतोच? कारण काहीही असले, तरी संशयाच्या भोवर्‍यात तोच अधिकारी सापडतो अन् तेही पोलिस ठाण्याचे प्रमुख काम पाहणारे निरीक्षक दर्जाचे अधिकारी, हे विशेष.

इसारवाडे याच्या घरातील व शेतातील छायाचित्रे ‘सोशल मीडियावर व्हायरल’ होतात. ते खरे की खोटे, हा तपासाचा भाग आहे. मात्र, हा घटनाक्रम पाहता त्या पोलिस निरीक्षकाचे काम संशयास्पद आहे, हे स्पष्ट होते. पोलिस निरीक्षक दर्जाचा अधिकार्‍याच्या अधिकार्‍याची फसणूक करण्याची हिंमत करणार्‍याला योग्य शिक्षा झालीच पाहिजे. त्यात दुमत असण्याचे कारण नाही. 5 गुन्ह्यांत आरोपी झाल्यामुळे ते होणार, यातही काही शंका उरली नाही. मात्र, शेकडो कॉल करून कोणीतरी पोलिस निरीक्षकांना लाखो रुपयांना गंडवितो, सरकारी वर्दी चोरीला जाणे अथवा ती कोणाच्या तरी घरात सापडणे, हा प्रकार गंभीर स्वरुपाचा आहे. यासोबत आणखीही काही प्रश्‍न उद्भवतातच. पोलिस निरीक्षकाने इसारवाडे याला दिलेल्या 6 लाख 20 हजार रुपयांच्या रकमेचा स्त्रोत काय होता? कारण ही रक्कम त्यांच्या वर्षभराच्या वेतनाहून अधिक आहे. अधिकृत स्त्रोतातून ही रक्कम आली, असे गृहित धरले, तरीही असे नेमके कोणते कारण होते, की एखादा पोलिस निरीक्षक दर्जाचा अधिकारी स्वतःच्या वार्षिक उत्पन्नापेक्षा जास्त रक्कम दुसर्‍याला देतो? तसेच त्या रकमेचे व्यवहार बँक खात्यावर दिसत आहेत का? ही सर्व परिस्थिती पाहता, सदर पोलिस निरीक्षकाचे वर्तन पोलिस खात्यासाठी अशोभनीय आहे, हे सांगण्यासाठी कोणा तज्ज्ञाची आवश्यकता नाही. या घटनाक्रमामुळे इसारवाडे याची तर गेलीच, पण त्या सोबतच जाळ्यात अडकलेल्याची किती उरली?