Fri, Jul 19, 2019 13:30होमपेज › Ahamadnagar › एक नवरा आणि दोन बायका एकाच मांडवात विवाहबद्ध 

एक नवरा आणि दोन बायका एकाच मांडवात विवाहबद्ध 

Published On: May 04 2018 2:47PM | Last Updated: May 04 2018 2:47PMनगर : प्रतिनिधी 

लग्नाचे वय झाले पण मुलीच मिळेनात अशा प्रतिक्रीया लग्नास उपवर असलेल्या तरूणांच्या असतात.पण, नगरमधील एका तरूणाने एकाच मांडवात चक्क दोन तरूणींशी लग्न केले आहे. बिलोली तालुक्यातील कुंडलवाडी पासुन जवळच असलेल्या माचनुर येथे हा अनोखा विवाहसोहळा पार पडला. विशेष म्हणजे या दोन्ही वधू सख्या बहिणी आहेत. 

त्याच झाले असे की, बिलोली तालुक्यातील कोटग्याळ येथील गंगाधर शिरगिरे यांना तीन मुली आहेत. यामधील धुरपतबाई अशंत: मतीमंद आहे. धुरपतबाई व राजश्री उपवर असल्याने घरी लग्नाची चर्चा सुरू झाली. पण, मोठी मुलगीला सोडून राजश्रीला स्थळ येऊ लागली. मोठी मुलगी मतीमंद असल्याने तिच्याशी कोण विवाह करणार या विचारांनी कुटुंबिय चिंताग्रस्त होते. 

अशातच राजश्रीने पुढाकार घेत ‘माझ्याशी विवाह करावयाचा असल्यास मोठ्या बहिणालाही स्विकारावे’ अशी अटच ठेवली. राजश्रीची ही अट मान्य करून समराळा ता.धर्माबाद येथील सायन्ना उरेकर यांचा साईनाथ नावाचा मुलगा या विवाहास तयार झाला. दोन्ही वधू-वरांचे पालक व नातेवाईक या विवाहास तयार झाले. 

‘मिया बीबी राजी, परिवार भी राजी’ यामुळे या विवाहाची जोरदार तयारी करण्यात आली. या विवाहाच्या पत्रिकेतही दोन वधू व एक वर असा उल्लेख करण्यात होता. या २ वधू आणि १ का वराचे लग्न 2 मे बुधवारी सकाळी 11 वाजताच्या एकाच मंडपात पार पडले. दोन्ही गावच्या निमंत्रित ,पाहुणे,नातेवाईक व माजी आमदार रावसाहेब अंतापुरकर यांनी लग्न सोहळ्यास उपस्थित राहुन नववधु-वरास शुभाशिर्वाद दिले. मतीमंद मोठ्या बहिणीशी विवाह करण्यास कुणीही तयार नसल्याने मनाचा मोठेपणा दाखवित धाकटी राजश्री ही पुढे आली.यामुळे राजश्री ने एक नवा आदर्श समाजासमोर दिला आहे. 


पत्रिका सोशल मिडीयावर तुफान व्हायरल 

या लग्नाची पत्रिका व्हायरल झाली होती. यामुळे  ‘आम्ही लग्नाळू’ म्हणणाऱ्या अनेकांनी या वराला टोमणे मारले. एक लग्न झाल्यावर दुसरे लग्न करणे आपल्याकडे नवीन नाही. मात्र, एकाच लग्नात दोन सख्या बहिणींशी लग्न म्हणल्यावर अनेकांनी हि पत्रिका फेक असल्याचा अंदाज देखील वर्तवला होता. पण आता या व्हायरल पत्रिकेचे सत्य समोर आले आहे.

Tags : Nagar, marriage, Sisters