होमपेज › Ahamadnagar › जागतिक स्पर्धेसाठी परिपूर्ण विद्यार्थी घडवा

जागतिक स्पर्धेसाठी परिपूर्ण विद्यार्थी घडवा

Published On: Jun 18 2018 1:08AM | Last Updated: Jun 18 2018 12:26AMश्रीरामपूर : प्रतिनिधी

तांत्रिक आणि कौशल्याधारित शिक्षणाचे महत्त्व ओळखून पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील यांनी 1981 मध्ये विनाअनुदानित तत्त्वावरील राज्यातील पहिले तंत्रनिकेतन प्रवरेमध्ये सुरू केले. त्यानंतर हीच संकल्पना राज्यभर राबविली गेली. आता त्यांचे स्वप्न साकार करताना जागतिक स्पर्धेला सामोरे जाणारा परिपूर्ण विद्यार्थी तयार करण्याचे काम प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेला करावे लागेल, असे प्रतिपादन विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.

प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या शाळा आणि महाविद्यालयांच्या स्थानिक सल्लागार समिती सदस्यांसमवेत आयोजित सहविचार सभेत ना. विखे पाटील हे  अध्यक्षस्थानावरून उपस्थितांना मार्गदर्शन करत होते. 
याप्रसंगी व्यासपीठावर माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के, आबासाहेब खर्डे, नाशिक विभागाचे सहसंचालक डॉ. ज्ञानदेव नाठे, रावसाहेब साबळे, बाळासाहेब भवर, डॉ. भास्करराव खर्डे, के.पी.नाना आहेर, ज्ञानदेव म्हस्के, अण्णासाहेब भोसले, संजय जोशी, किशोर नावंदर, अ‍ॅड. अप्पासाहेब दिघे उपस्थित होते. 

यावेळी संस्थेंतर्गत विविध माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमधील  दहावी, बारावी परीक्षेच्या निकालाचा, चालू शैक्षणिक वर्षातील प्रवेश, डिजिटल क्लासरूमची संख्या वाढविणे आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू करण्याबरोबरच शिक्षकांना कॉम्प्युटर ट्रेनिंग, फॉरेन लँग्वेज तसेच शाळा-बाह्य विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणार्‍या कौशल्य विकास कार्यक्रमाबाबत आढावा घेण्यात आला.ना. विखे म्हणाले की, पद्मभूषण विखे पाटील यांनी 10 किमी परिसरात प्राथमिक-माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि पदवी शिक्षणाचे जाळे निर्माण केल्यानेच देशातील सर्वाधिक साक्षरतेचे प्रमाण असलेल्या प्रवरा परिसरातून 94 हजार विद्यार्थी शिक्षण घेऊन विविध क्षेत्रांमध्ये काम करीत आहेत. बाबासाहेब भोसले मुख्यमंत्री असताना खासदार बाळासाहेब विखे यांनी तंत्रशिक्षणाच्या प्रसारासाठी पुढाकार घेऊन विनाअनुदानित तत्त्वावरील राज्यातील पहिल्या तंत्रनिकेतनला परवानगी मिळविली. त्यानंतर मुख्यमंत्री झालेल्या वसंतदादा पाटील यांनी ही संकल्पना राज्यभर राबविली. या माध्यमातून आज प्रवरेतूनही चांगल्या दर्जाचे विद्यार्थी घडत आहेत. यापुढेही हे कार्य अविरत सुरू राहील.

माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के म्हणाले की, तांत्रिक शिक्षणाबरोबरच मुलींना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी शैक्षणिक वातावरण निर्माण करण्याची गरज असून त्यांच्यात नवा आत्मविश्वास निर्माण करण्याची आज आवश्यकता आहे. संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक कोल्हे यांनी प्रास्तविक केले. सूत्रसंचालन डॉ शांताराम चौधरी यांनी केले, तर प्रा. शिवाजी रेठरेकर यांनी आभार मानले. यावेळी प्रवरा महाविद्यालयातील शिक्षक, प्राध्यापक तसेच कर्मचारी वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.