होमपेज › Ahamadnagar › गांधी जयंतीपासून गावोगावी आंदोलने करा : अण्णा हजारे 

गांधी जयंतीपासून गावोगावी आंदोलने करा : अण्णा हजारे 

Published On: Aug 27 2018 1:12AM | Last Updated: Aug 26 2018 10:54PMपारनेर : प्रतिनिधी

स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात, देशात लोकपाल व राज्यात लोकायुक्त नियुक्त करण्याच्या मागणीसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे 2 ऑक्टोबरपासून राळेगणसिद्धीत आंदोलन करणार असून देशभरातील कार्यकर्त्यांनी राळेगणसिद्धीकडे न येता आपापल्या गावात, शहरात आंदोलने करावे, तसेच पंतप्रधानांनी दिलेल्या आश्‍वासनानुसार त्यांना व राष्ट्रपतींना पत्र पाठविण्याचे आवाहन हजारे यांनी रविवारी केले आहे. 

या पत्रात हजारे म्हणतात, 23 मार्च 2018 रोजी शेतकर्‍यांना उत्पादनाच्या खर्चावर आधारित दर मिळावेत तसेच लोकपाल व लोकायुक्तांच्या नियुक्तीच्या मागणीसाठी आपण दिल्लीतील रामलीला मैदानावर आंदोलन केले होते. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सहा महिन्यांत मागण्यांची पूर्तता करण्यात येईल, असे लेखी आश्‍वासन दिले होते. त्यांच्या आश्‍वासनानुसार आपण आंदोलन मागे घेतले होते. 

परंतु, गेल्या पाच महिन्यांत पंतप्रधान मोदी यांना आश्‍वासनपूर्तीबाबत सहा वेळा पत्र पाठविण्यात आले. मात्र अद्यापही सरकारने काहीही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे 2 ऑक्टोबर या महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनी आपण याच मागण्यांसाठी राळेगणसिद्धीत आंदोलन सुरू करणार आहोत. ज्या कार्यकर्त्यांना असे आंदोलन करणे गरजेचे वाटते अशा कार्यकर्त्यांनी आपले गाव, तालुका, जिल्ह्याच्या ठिकाणी आंदोलने करण्याचे आवाहन हजारे यांनी केले आहे. 

आंदोलनात सहभागी होण्यासाठी राळेगणसिद्धीकडे येऊ नये, अशी विनंती हजारे यांनी केली आहे. कार्यकर्त्यांना दिलेल्या पत्रासोबत पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी हजारे यांना पाठविलेल्या पत्राची तसेच आंदोलनादरम्यान देण्यात आलेल्या लेखी आश्‍वासनाच्या छायाप्रतीही  प्रसिध्दीस देण्यात आल्या आहेत.