Mon, Jun 24, 2019 20:58होमपेज › Ahamadnagar › महिलादिनी मतदार नोंदणी

महिलादिनी मतदार नोंदणी

Published On: Mar 01 2018 1:46AM | Last Updated: Feb 28 2018 11:25PMनगर : प्रतिनिधी

लोकशाही प्रक्रियेमध्ये महिलांचा अधिकाधिक सहभाग राहावा आणि त्या माध्यमातून मतदार नोंदणीची जनजागृती व्हावी, यासाठी आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून जिल्हाभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी अभय महाजन यांनी सांगितले. 

महिला दिनाचा मुख्य कार्यक्रम नगर येथील माऊली सभागृहात 8 मार्च रोजी सकाळी 9 वाजता आयोजित करण्यात आला आहे. वक्‍तृत्व स्पर्धा, रांगोळी, वादविवाद स्पर्धांसह  5 मार्च ते 12 मार्च या कालावधीत महिला मतदार नोंदणीचे विशेष अभियान जिल्हाभरात राबविण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी अभय महाजन यांच्या अध्यक्षतेखाली काल (दि.28) नियोजन भवनात बैठक झाली. या बैठकीत त्यांनी महिला दिनानिमित्त आयोजित करावयाच्या विविध कार्यक्रमांबाबत निर्देश दिले. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी अरुण आनंदकर, उपविभागीय अधिकारी उज्ज्वला गाडेकर, तहसीलदार सुधीर पाटील आदींसह विविध विभागांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

महिला दिनानिमित्त आयोजित विविध कार्यक्रमात आशा, अंगणवाडी कार्यकर्ती, महिला कल्याण अधिकारी,  शिक्षिका, महिला बचत गटाच्या सदस्या यांच्यामार्फत मतदार जागृती अभियान राबविण्यात येणार आहे. तसेच महिला आणि पुरुष गुणोत्तरातील तफावत कमी व्हावी, यासाठी विविध पातळ्यांवर जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. आदिवासी विभाग, सहकार विभाग, शिक्षण, आरोग्य, महिला व बालविकास आदी विभागांमार्फत त्यांच्या अधिपत्याखाली असणार्‍या विविध संस्थांच्या माध्यमातून ही जागृती केली जाणार आहे. महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जिल्ह्यात हे कार्यक्रम नियोजनबद्ध आणि व्यापक प्रमाणात राबविण्याच्या निर्देश महाजन यांनी दिले.