होमपेज › Ahamadnagar › महाराष्ट्र बँक थेट शेतकर्‍यांच्या दारी

महाराष्ट्र बँक थेट शेतकर्‍यांच्या दारी

Published On: Jul 29 2018 1:20AM | Last Updated: Jul 28 2018 11:56PMश्रीरामपूर : प्रतिनिधी

एरवी छोट्या-छोट्या कामासाठी अधिकार्‍यांची वाट बघणारे शेतकरी, आपुलकीने विचारपूस करणारे बँकेचे अधिकारी बघून अचंबित झाले. दरम्यान, महाराष्ट्र बँक शेतकर्‍यांच्या दारात आल्याने शेतकरी व बँक अधिकार्‍यांची प्रश्‍नोत्तरांची जुगलबंदी सर्वांचे आकर्षण ठरली.

निमित्त होते चितळी (ता. राहाता) येथील महाराष्ट्र बँकेच्या वतीने आयोजीत केलेल्या शेतकरी मेळाव्याचे. अ‍ॅड.अशोकराव वाघ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मेळाव्यासाठी ज्येष्ठ नेते शिवाजीराव वाघ, गंगाधर चौधरी, संपतराव चौधरी, बाळासाहेब वाघ, पै. रविंद्र वाघ, भाऊसाहेब मोरे, दिलीप चौधरी, बँकेचे विभाग व्यवस्थापक मोहंती, चितळी शाखेचे उपप्रमुख सचिन कोर्डे, वाकडी शाखा व्यवस्थापक गौरव कुमार, कृषी अधिकारी मयुरी खर्डे आदी उपस्थित होते.

प्रारंभी सचिन कोर्डे यांनी प्रास्ताविक करताना बँकेच्या विविध योजनांची माहिती दिली. यावेळी बँकेच्या चितळी शाखेमध्ये जागा कमी असल्यामुळे ग्राहकांना प्रचंड त्रास होतो. अधिकारी कमी असल्याने कामामध्ये दिरंगाई होते. बँकेने एटीएम सेवा सुरू करावी, ऑनलाईन जोडणी नियमीत करावी. शेतकरी ग्राहक अडाणी असल्याने त्याच्या कर्जाचा बोजा उतार्‍यावर चढविताना बँकेने पुढाकार घ्यावा. सर्च रिपोर्टसाठी शेतकर्‍यांची आर्थिक पिळवणूक थांबवावी. बँकेच्या विविध योजनांचे परिपत्रक भिंतीवर लावावे,  यासह अनेक मागण्या मांडण्यासाठी अ‍ॅड. अशोक वाघ, संपत चौधरी, गंगाधर चौधरी, भाऊसाहेब मोरे, रविंद्र वाघ, विलास गायकवाड, दिलीप चौधरी, शंकरराव लहारे, बाळासाहेब कोते, अ‍ॅड. गोपीनाथ चौधरी, रमेश वाणी आदींचे भाषणे झाली.

शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांना कृषी अधिकारी मयुरी खर्डे यांनी समर्पक उत्तरे दिली. विभाग व्यवस्थापक मोहंती यांनी बँकेच्या विविध योजनांची माहिती देवून त्याचा लाभ घेण्याचे आवाहन केले.मेळाव्यासाठी बँकेचे सेवक केशव भोसले, सुभाष जाधव, चंद्रभान पगारे, प्रकाश पगारे आदींसह चितळी, वाकडी, जळगाव, पंचक्रोशीचे ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन रमेश जाधव यांनी केले. आभार नारायण कदम यांनी मानले.