Thu, Apr 25, 2019 03:34होमपेज › Ahamadnagar › खा. गांधींवर अपहरण, खंडणीचा गुन्हा दाखल

खा. गांधींवर अपहरण, खंडणीचा गुन्हा दाखल

Published On: Feb 25 2018 1:15AM | Last Updated: Feb 24 2018 11:56PMनगर : प्रतिनिधी

संगनमताने अपहरण करून कार शोरूम मालकाला खंडणी मागितल्याप्रकरणी भाजपचे खासदार दिलीप गांधी, नगरसेवक सुवेंद्र गांधी या पिता-पुत्रांसह चौघांविरुद्ध शनिवारी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या आदेशानंतर ही फिर्याद नोंदविण्यात आली आहे.

गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये गांधी पिता-पुत्रासह पवन प्रकाश गांधी (रा. सथ्था कॉलनी, स्टेशन रस्ता, नगर) व सचिन दिलीप गायकवाड (रा. श्रीगोंदा) यांचाही समावेश आहे. याबाबत फोर्ड शोरूमचे मालक भूषण गोवर्धन बिहाणी (रा. मोतीमहल, महेशनगर, आरटीओ ऑफिसशेजारी, नगर) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, खा. दिलीप गांधी यांनी जानेवारी 2015 मध्ये बिहाणी यांच्या फोर्ड शोरूममधून फोर्ड एन्डेव्हर कार खरेदी केली होती. ती गाडी त्यांनी 27 जून 2016 रोजी पवन गांधींना विकली. त्यानंतर पुन्हा 30 जुलै 2016 रोजी ही गाडी देवेंद्र गांधी यांना विकली. 29 सप्टेंबर 2015 रोजी सुवेंद्र गांधी यांनी वितरण व्यवस्थापक सुशील ओसवाल व वर्क्स मॅनेजर अजय रसाळ या दोघांना शोरूममबाहेर बोलावून घेतले. 

दोघांचे अपहरण करून त्यांना एमआयडीसी अग्निशमन दलाजवळ नेले. त्यानंतर भूषण बिहाणी यांना तेथे बोलावून घेतले. बिहाणींसह शोरुमच्या दोन अधिकार्‍यांना निंबळक बायपासजवळ निर्जनस्थळी नेले. सुवेंद्र गांधी व त्याच्या साथीदारांची निर्दयीपणे मारहाण करून बंदुकीच्या धाकाने सचिन गायकवाड याच्या खात्यावर ‘आरटीजीएस’द्वारे 16 लाख 74 हजार रूपये जबरदस्तीने जमा करायला लावले. त्यानंतर जबरदस्ताने नोटरी करून घेत उसनवारी दाखविली होती. शोरुममधील 10 फोर्ड इको कार, कागदपत्रांसह घेऊन गेले. त्याबदल्यात खंडणीची मागणी केली. नंतरच्या काळात 10 पैकी 9 कार त्यांनी परत केल्या व एक कार खा. गांधी यांची मुलगी स्मिता नवसारीकर हिच्यासाठी ठेवून घेतली. त्यापोटी 5 लाख रुपये त्यांनी जमा केले. खा. गांधी यांनी पदाचा वापर करुन बिहाणी यांच्या विरोधात मंत्री, आयकर व विक्रीकर विभागाकडे तक्रारी करुन त्यांना त्रास दिला आहे.

वेळावेळी मोबाईलवरून फोन व मेसेज करण्यात आले. त्याचे रेकार्ड बिहाणी यांनी जतन करून ठेवले आहे. चौघांनी मिळून वेगवेगळ्या प्रकार धमकी देऊन वेठीस धरून भरपूर पैसे उकळले आहेत. खंडणी मागणी करून तुरुंगात पाठविण्याचीही धमकी दिली, असे असेही फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी चौघांविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात 84/2018 क्रमांकाने भारतीय दंड विधान कलम 384, 366, 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशावरून या गुन्ह्याचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीआयडी) वर्ग करण्यात येणार आहे.