होमपेज › Ahamadnagar › गुजरातमध्ये काँग्रेस बहुमतात : चव्हाण 

गुजरातमध्ये काँग्रेस बहुमतात : चव्हाण 

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

शिर्डी : प्रतिनिधी

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना होम ग्राउंड असलेल्या गुजरातमध्ये 50-50 सभा घेण्याची वेळ येऊन ठेपली आहे. त्यामुळे काँग्रेस गुजरातमध्ये बहुमतात येईल, असा विश्वास पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी शिर्डीत व्यक्त केला.

चव्हाण शिर्डीत साई दर्शनासाठी आले असता, पत्रकारांशी बोलत होते. याप्रसंगी काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के, उपनगराध्यक्ष जगन्नाथ गोंदकर, नगरसेवक अभय शेळके, माजी विश्वस्त अशोक खांबेकर आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

खा. चव्हाण म्हणाले की, पंजाबमधील गुरुदासपूर, चित्रकूटमधील पोटनिवडणुकीत पक्षाने बाजी मारली आहे. त्याचबरोबर नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमध्येही यश संपादन केले आहे. नांदेडच्या विजयामुळे जनतेचा आमच्यावरचा विश्वास वाढत चालला आहे. केंद्र व राज्य सरकारविषयी  जनतेच्या मनात स्फोटक भावना आहेत. 

देशात शेतकर्‍यांच्या आत्महत्येमध्ये वाढ होतच चालली आहे. त्यामुळे देशाचे चित्र बदलत चालले आहे.  राज्यात जवळपास 89 लाख शेतकर्‍यांना कर्जमाफी राज्य सरकारने घोषणा केली आहे. परंतु हे सरकार कर्जमाफी देऊ शकतील का ? असा प्रश्न चव्हाण यांनी उपस्थित केला आहे. काँग्रेस सरकारच्या काळात आम्ही 150 टक्के हमीभाव दिला होता. या सरकारने केवळ यात अवघी अडीच टक्के वाढ केली आहे. यासाठी शेतकर्‍यांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेली यंत्रणा इतकी कुचकामी आहे की, त्याकडे शेतकरी वळतच नाही.  तसेच राज्यात उसाच्या भाववाढीबाबत सर्व काही कायद्याप्रमाणेच असताना सरकारने या मुद्यावर अवाजवी हस्तक्षेप करणे योग्य नव्हते. 

साईबाबा समाधी शताब्दी सोहळा हा भाविकांसाठी पर्वणीचा असताना या सरकारने शिर्डीसाठी कोणताही निधी दिला नाही. ही खेदाची बाब आहे. नांदेड येथे गुरू दा गद्दी हा सोहळा साजरा करण्यासाठी चार वर्षे अगोदर तयारी केली होती. यांच्याकडेही वेळ होता. मात्र. भाविकांच्या पदरी निराशा पडली, ही बाब दुर्दैवी आहे, असे खा. चव्हाण म्हणाले.