Sat, Mar 23, 2019 16:08होमपेज › Ahamadnagar › रक्ताचे पाणी केल्यानेच आमदारकी : कर्डिले

रक्ताचे पाणी केल्यानेच आमदारकी : कर्डिले

Published On: Mar 19 2018 1:46AM | Last Updated: Mar 18 2018 10:43PMनगर : प्रतिनिधी

जनसेवा हीच ईश्‍वर सेवा मानून दररोज सतरा ते अठरा तास काम करीत आहे. रक्ताचे पाणी करीत असल्याने गेल्या पंचवीस वर्षांपासून जनता मला आमदारकीची संधी देत आहे. जिल्हा बँकेचे अध्यक्ष व मंत्रिपदावरही काम करण्याची संधी मिळाली, असे प्रतिपादन माजी मंत्री व आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी केले.

नगर तालुक्यातील बुर्‍हाणनगर येथे आठवडे बाजाराचे उद्घाटन व 3 कोटींच्या विकासकामांचे लोकार्पण माजी मंत्री कर्डिले यांच्या हस्ते करण्यात आले. भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड, बाजार समिती सभापती विलास शिंदे, उपसभापती रेश्मा चोभे, बाजीराव गवारे, अक्षय कर्डिले, खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष रोहिदास मगर, संभाजी पवार, अनिल करांडे, भाजपा तालुकाध्यक्ष दिलीप भालसिंग, हरिभाऊ कर्डिले आदी यावेळी उपस्थित  होते. भुईकोट किल्ला-बुर्‍हाणनगर-कापुरवाडी-शेंगदाणा मठ रस्त्याचे लोकार्पणही आ. कर्डिले यांच्या हस्ते करण्यात आले.  

आ. कर्डिले म्हणाले की, मागील युती सरकारच्या काळात मंत्रिपद मिळत असतानाही पाणीप्रश्‍नाला प्राधान्य दिले. बुर्‍हाणनगर, घोसपुरी, चांदा आदी पाणीयोजना राबवून पाणीप्रश्‍न सोडविला. पंचवीस वर्षांत नगर, नेवासे, राहुरी, नगर व पाथर्डी तालुक्यांतील मूलभूत प्रश्‍न सोडविले. जतनेच्या पाठबळावरच आता डबल हॅटट्रिक करण्याची संधीही मिळणार आहे. महिला बचत गटांना जिल्हा बँकेच्या माध्यमातून अर्थसाह्य करीत आहे. त्याचबरोबरच शेतीला पूरक  व्यवसाय म्हणून दूधधंदा करण्यासाठी शेतकर्‍यांना आर्थिक ताकद देण्याचे काम केले. जनसेवेचे घेतलेला वसा शेवटच्या श्‍वासापर्यंत सोडणार नसल्याचे आ. कर्डिले यांनी निक्षून सांगितले.

प्रा. बेरड म्हणाले की, आ. कर्डिले जनसेवेत रमल्यानेच त्यांना लोकनेता पदवी जनतेनेचे बहाल केली आहे. सभापती शिंदे यांच्या भाषणाचा धागा पकडून  आ. कर्डिले आता सर्वपक्षीय नेते झाले आहेत. मात्र, ते भाजपचे नेते व आमदार असल्याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो. 

सभापती शिंदे यांनी आ. कर्डिले आता सर्वपक्षीय नेते झाल्याचा उल्लेख केला. सक्षम आमदार असला की कसा विकास होतो, हे त्यांनी सिद्ध करून दाखविले आहे. रोहिदास मगर यांचेही भाषण झाले. प्रास्ताविक प्रा. रामेश्‍वर दुसुंगे यांनी केले.