Mon, Jun 24, 2019 17:26होमपेज › Ahamadnagar › आमदार जगतापांना आम्हीच पळविले!

आमदार जगतापांना आम्हीच पळविले : कर्डिले

Published On: Apr 11 2018 1:34AM | Last Updated: Apr 11 2018 7:35AMनगर : प्रतिनिधी

जमावातील लोकांनी दरवाजा तोडून आमदार संग्राम जगताप यांना पोलिस अधीक्षक कार्यालयातून बाहेर काढले. त्यावेळी आमदार अरुण जगताप, दादाभाऊ कळमकर व मी त्यांना बोलावून घेतले. त्यानंतर काळ्या रंगाच्या गाडीतून पळवून नेले, अशी कबुली आमदार शिवाजी कर्डिले यांनी पोलिस कोठडीत दिली आहे. त्यांच्यासह 5 जणांच्या कोठडीत न्यायालयाने मंगळवारी 2 दिवसांची वाढ केली आहे.

आमदार शिवाजी भानुदास कर्डिले (रा. बुर्‍हाणनगर, ता. नगर), अफजल असीर शेख (रा. बुरुडगाव रस्ता, एलआयसी ऑफिससमोर) यांच्या कोठडीत गुरुवारपर्यंत वाढ झाली. तर सोमवारी रात्री अटक केलेल्या सुरेश लक्ष्मण बनसोडे (रा. निखिल रो हौसिंग सोसायटी, बोल्हेगाव), सारंग ऊर्फ सागर अंबादास पंधाडे (रा. मोहनबाग, दिल्लीगेट), शुभम राजेंद्र राजवाळ (रा. कायनेटिक चौक) यांनाही दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. तसेच या गुन्ह्यातील इतर 22 आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनाविण्यात आली आहे.

पोलिस अधीक्षक कार्यालयावरील हल्ला प्रकरणात अटक करण्यात आलेल्या 27 आरोपींना मंगळवारी दुपारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. 

तपासी अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप पाटील व सरकारी वकील अ‍ॅड. ज्योती लक्का यांनी पोलिस कोठडीची मागणी केली. ते युक्तिवाद करताना म्हणाले की, पोलिस अधीक्षक कार्यालयावर हल्ला करण्यासाठी जाताना आरोपींनी मोटारसायकली व इतर वाहने वापरली होती. ती वाहने हस्तगत करायची आहेत. त्यामुळे 22 आरोपींना दोन दिवसांची पोलिस कोठडी देण्यात यावी. 

जमावाने आमदार संग्राम यांना पोलिस अधीक्षक कार्यालयातून बाहेर काढले, त्यावेळी आमदार शिवाजी कर्डिले, आमदार अरुण जगताप व माजी आमदार दादा कळमकर यांनी आमदार संग्राम बोलावून घेतले व काळ्या रंगाच्या वाहनातून तेथून घेऊन गेले. ते वाहन कोणते व कोणाच्या नावे आहे, याची चौकशी करायची आहे. आ. कर्डिले, अफजल शेख, सुरेश बनसोडे, सारंग पंधाडे यांना पोलिस अधीक्षक कार्यालयातील दोन सीसीटीव्ही कॅमेर्‍यांतील फूटेज दाखविले असता, त्यांनी नव्याने 49 नावे सांगितलेली आहेत. त्यांना इतर सीसीटीव्ही कॅमेरे दाखवून अज्ञात दीडशे ते दोनशे आरोपींची नावे निष्पन्न करायची आहेत. त्यामुळे या चौघांनाही 7 दिवसांची पोलिस कोठडी देण्यात यावी. चौकशीतून निष्पन्न झाल्यानंतर अटक केलेल्या शुभम राजवाळ यालाही 7 दिवसांची कोठडी देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.
त्यावर आरोपीच्या वकिलांनीही बचावाचा प्रयत्न केला. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने आ. कर्डिले यांच्यासह पाच आरोपींना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. त्यांना गुरुवारी (दि. 12) न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. इतर 22 आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

गुन्ह्यात कलमे वाढविली

महिला पोलिसांसह इतर कर्मचार्‍यांवर दबाव टाकून, त्यांच्यावर हल्ला करून जीवितास धोका निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी या गुन्ह्यात भारतीय दंड विधानाचे 114, 117 व 308 ही कलमे वाढविण्यात आली आहेत. त्यामुळे न्यायालयीन कोठडी सुनावलेल्या आरोपींना जामिनासाठी जिल्हा व सत्र न्यायालयात धाव घ्यावी लागणार आहे.

आमदार कर्डिले हे पोलिस कोठडीत काय म्हणाले..

आमदार कर्डिले यांनी पोलिस कोठडीत असताना चौकशीत सांगितले आहे की, घटनेच्या दिवशी पाणी फाऊंडेशनची नगर तालुक्यातील डोंगरगण येथील बैठक आटोपून औरंगाबाद रस्त्याने पोलिस अधीक्षक कार्यालयाजवळ आलो. तेथे गर्दी दिसली. गर्दीतील लोकांना कारण विचारले असता त्यांनी नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांना पोलिसांनी केडगाव येथील खुनाच्या संदर्भात चौकशीसाठी पोलिस अधीक्षक कार्यालयात आणले असून, त्यांची चौकशी सुरू आहे. त्यामुळे कार्यकर्ते आक्रमक झाले. त्यांनी एसपी कार्यालयाचा दरवाजा तोडून आमदार संग्राम जगताप यांना बाहेर काढले. त्यावेळी मी, आमदार अरुण जगताप, दादा कळमकर यांनी आमदार जगताप यांना बोलावून घेतले व या ठिकाणावरून काळ्या रंगाच्या वाहनातून घेऊन गेलो.