Mon, Mar 25, 2019 04:57
    ब्रेकिंग    होमपेज › Ahamadnagar › आमदार संग्राम जगताप यांना जामीन मंजूर

आमदार संग्राम जगताप यांना जामीन मंजूर

Published On: Jul 08 2018 1:42AM | Last Updated: Jul 08 2018 1:42AMनगर : प्रतिनिधी

केडगाव येथील शिवसैनिकांच्या दुहेरी हत्याकांड प्रकरणी गेल्या तीन महिन्यांपासून न्यायालयीन कोठडीत असलेल्या आ. संग्राम जगताप यांना अखेर काल न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. तब्बल तीन महिन्यानंतर त्यांची न्यायालयीन कोठडीतून सुटका झाली आहे. आ. जगताप यांच्यासह बाळासाहेब एकनाथ कोतकर यांना प्रत्येकी 15 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जिल्हा व सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला. सायंकाळी 5 वाजता ते औरंगाबाद येथील हर्सूल कारागृहाच्या बाहेर आले.

गाजलेल्या केडगाव दुहेरी हत्याकांड प्रकरणात राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीआयडी) अधिकार्‍यांनी शुक्रवारी (दि. 6) जिल्हा व सत्र न्यायालयात आठ आरोपींच्या विरोधात 1366 पानी दोषारोपपत्र दाखल केले. दोषारोपपत्र दाखल केलेल्या आरोपींमध्ये आ. संग्राम जगताप व बाळासाहेब एकनाथ कोतकर यांचा समावेश नव्हता. मात्र, सीआरपीसी 173 (8) नुसार कारवाईची तजवीज ठेवण्यात आली होती.

या पार्श्वभूमीवर काल (दि.7) सकाळी 11 च्या सुमारास आ. जगताप व बाळासाहेब कोतकर यांच्या वतीने सीआरपीसी 167 (2) (ब) नुसार 5 वे सह दिवाणी न्यायाधीश श्रीमती एस. एस. पाटील यांच्या कोर्टात वकिलांनी जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. त्यावर सुनावणीदरम्यान जामीन मंजूर करण्यात आला. ‘केडगाव हत्याकांड हा गुन्हा गंभीर असून, आरोपींना जामीन दिल्यास गुन्ह्याच्या तपासात आरोपींतर्फे हस्तक्षेप होऊन साक्षीदारांवरही दबाव आणला जाऊ शकतो. त्यामुळे आरोपींना जामीन देऊ नये’, अशी मागणी सरकारी वकील श्रीमती इथापे यांनी केली.

मात्र, 90 दिवसांत दोषारोपपत्र दाखल झालेले नाही. त्यामुळे आरोपींना जामिन मिळण्याचा अधिकार असल्याचे म्हणणे आमदार जगताप यांचे वकील महेश तवले यांनी मांडले. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकल्यानंतर न्यायालयाने ‘साक्षीदारांवर दबाव टाकू नये, तपास यंत्रणेला मदत करावी, तपासी अधिकार्‍यांनी चौकशीला बोलावल्यानंतर लगेच हजर राहावे’, या अटी ठेवत या दोघांना जामीन मंजूर केला.

या गुन्ह्यात आ. शिवाजी कर्डीले, आ. अरुण जगताप यांच्यासह इतर 22 आरोपींची नावे आरोपी म्हणून आहेत. मात्र, दोषारोपपत्र दाखल करताना अवघ्या आठ जणांचीच नावे आली आहेत. उर्वरित आरोपींबाबत सीआयडीमार्फत तपास सुरू आहे. ठोस पुरावे मिळाल्यास त्यांचीही नावे पुरवणी दोषारोपपत्रात येऊ शकतात. दरम्यान, अटकपूर्व जामिनासाठी इतर आरोपींकडून अर्ज केला जाण्याची शक्यता आहे.