Thu, May 23, 2019 20:50
    ब्रेकिंग    होमपेज › Ahamadnagar › आमदार संग्राम जगतापांचा जामीन अर्ज माघारी

आमदार संग्राम जगतापांचा जामीन अर्ज माघारी

Published On: Apr 27 2018 12:51AM | Last Updated: Apr 26 2018 11:12PMनगर : प्रतिनिधी

केडगाव दुहेरी हत्याकांडात आरोपी असलेल्या आ. संग्राम जगताप यांनी जामिनासाठी न्यायालयात काल (दि. 25) अर्ज दाखल केला होता. आज अचानक त्यांच्या सांगण्यावरून अ‍ॅड. महेश तवले यांनी जामीन अर्ज माघारी घेतल्याने आ. जगतापांचा कोठडीतील मुक्काम कायम राहणार आहे.

गेल्या 7 एप्रिल रोजी केडगावात शिवसेना कार्यकर्ते संजय कोतकर व वसंत ठुबे यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात पोलिसांनी आ. संग्राम जगताप यांना अटक केली होती. पोलिसांनी त्यांच्यासह पोटनिवडणुकीतील काँग्रेसचा विजयी उमेदवार विशाल कोतकरसह 9 जणांना अटक केली. पोलिस कोठडी संपल्यानंतर आमदार जगताप हे न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांच्या पोलिस कोठडीची हक्क राखीव ठेवण्यात आला आहे. 

न्यायालयीन कोठडीत असल्याने आ. जगताप यांना न्यायालयात जामीन मिळण्याची शक्यता वाटत होती. बुधवारी जगताप यांचे वकील महेश तवले यांनी कोर्टात त्यांचा जामीन अर्जही दाखल केला. मात्र आमदार जगताप यांनीच निरोप धाडत तो माघारी काढून घेण्याची सूचना केली. त्यानुसार त्यांचा जामीन अर्ज माघारी काढण्यात आला आहे. तपास पूर्ण होईपर्यंत जामीन अर्ज टाकू नका, असा आ. जगताप यांचा निरोप आल्याने जामीन अर्ज काढला असल्याचे वकिलांनी सांगितले.