Tue, Jul 16, 2019 11:36होमपेज › Ahamadnagar › आ.जगताप यांनी वेधले सीएमचे लक्ष

आ.जगताप यांनी वेधले सीएमचे लक्ष

Published On: Dec 25 2017 1:21AM | Last Updated: Dec 24 2017 10:49PM

बुकमार्क करा

श्रीगोंदा : प्रतिनिधी

नागपूर येथील हिवाळी अधिवेशनामध्ये श्रीगोंदा तालुक्यातील विविध प्रश्‍नांवर तसेच विकास कामांच्या मागण्यासंदर्भात आ.राहुल जगताप यांनी लक्ष वेधून आवाज उठविला. मुख्यमंत्री देवेेंद्र फडणवीस यांच्याकडे देखील विविध विकास कामांसाठी व तालुक्यातील प्रलंबित प्रश्‍नांसाठी पाठपुरावा करत प्रस्ताव दाखल केले. तसेच केंद्र शासनाच्या नदीजोड प्रकल्प अंतर्गत भीमा व घोड नदीजोड प्रकल्प प्रस्ताव राज्य शासनाने केंद्र शासनाला प्रस्ताव पाठविण्या संदर्भात निवेदन देऊन चर्चा केली. यावेळी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीपराव वळसे, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, आ. राजेश टोपे, आ. दत्ता भरणे, आ. राहुल मोटे, आ. प्रदीप नाईक या आमदारांचे शिष्टमंडळ घेऊन प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले. 

भीमा व घोड नदीचे पाणी उजनीला जाते. दरवर्षी उजनी धरण भरून 60 ते 70 टीएमसी पाणी खाली वाहून जाते. परंतु या नदी शेजारील श्रीगोंदा, शिरुर, कर्जत हे तालुके मात्र पाण्यावाचून वंचित राहतात. एकीकडे 60 ते 70 टीएमसी पाणी वाहून जाते व दुसरीकडे वरील तालुक्यामध्ये शासनामार्फत पिण्याच्या पाण्याचे टँकर लावावे लागतात. भिमा नदीतून लाखो लिटर पाणी वाहून जाते. यावेळी घोडनदी कोरडी असते. या दोन्ही नद्या जोडल्या तर शिरुर, श्रीगोंदा व कर्जत तालुक्याचे नंदनवन होईल. तसेच श्रीगोंदा, शिरुर व कर्जत या तालुक्यातील शेतीसाठी 550 क्युसेसचा कॅनॉल घोडनदीवरुन जात आहे. त्या ठिकाणी नदीजोड करून घोडनदीतून कॅनॉलमध्ये पाणी आल्यास तेथील शेतकर्‍यांची कायमस्वरुपी पिण्याच्या पाण्याची व शेतीच्या पाण्याची सोय होईल. 

यावर केंद्र शासनाद्वारे महाराष्ट्र शासनामार्फत प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविण्याचे सुचविण्यात आलेले होते. त्या संदर्भात या अधिवेशनामध्ये मुद्दा उपस्थित करुन आंतरराज्य नदीजोड प्रकल्पांतर्गत महाराष्ट्र शासनामार्फत केंद्र शासनाला प्रस्ताव पाठवण्या संदर्भात लक्ष वेधून घेण्यात आले. हा प्रकल्प झाल्यास तालुक्यातील जनतेचा सर्वात महत्त्वाचा पाणी प्रश्‍न कायमचा निकाली निघेल. हा निकाली निघण्यासाठी मी सतत पाठपुरावा करणार असल्याचे आ.जगताप यांनी सांंगितले.