Tue, Mar 26, 2019 11:44होमपेज › Ahamadnagar › हल्लाबोल आंदोलनातून आ. जगतापांना बळ

हल्लाबोल आंदोलनातून आ. जगतापांना बळ

Published On: Feb 19 2018 1:58AM | Last Updated: Feb 18 2018 11:26PMश्रीगोंदा : अमोल गव्हाणे

श्रीगोंदा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने झालेल्या हल्लाबोल मोर्चात आ.राहुल जगताप यांनी आगामी विधनासभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकांची  मोठी गर्दी खेचत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना विचार करायला भाग पाडले. एवढेच नाही तर आगामी विधानसभा निवडणुकीच्या तिकिटावर शिक्कामोर्तब करून घेतले. आ. जगताप यांच्या जोरदार तयारीमुळे कार्यकर्त्यांमध्ये चांगलाच उत्साह संचारला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार,विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, खा. सुप्रिया सुळे, आ. दिलीप वळसे पाटील  यांच्या उपस्थितीमध्ये हल्लाबोल आंदोलन पार पडले. आ.जगताप आणि त्यांच्या समर्थकांनी या आंदोलनाची मोठी तयारी केली होती. या आंदोलनाला किती लोक येणार याबाबत उत्सुकता होती. कारण या सर्व सभेचे नियोजन आ. जगताप यानी स्वतः केले होते.

आ. राहुल जगताप यांनी अतिशय आक्रमकपणे आपली भूमिका मांडत सरकारवर हल्लाबोल केला. तालुक्याच्या विविध प्रश्‍नाावर प्रकाश टाकत माजीमंत्री बबनराव पाचपुते यांच्यावरही हल्ला चढविला. प्रत्येक विकासकामात आडवा पाय घालून माजीमंत्र्यांना नेमके काय साध्य करायच आहे, असा सवालही उपस्थित केला. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत तालुक्यातील नेत्यांनी एकत्र येत मला उमेदवारी दिली आणि निवडून आणले हे सांगत त्याना बरोबर घेऊन तालुक्यात विकासकामे सुरू असल्याचे सांगितले. कुकडी कारखान्याचे संस्थापक कुंडलिकराव जगताप यांच्या निधनानंतर आ. जगताप यांची ही पहिलीच सभा. त्याचा संदर्भ घेत आ. जगतापांनी ‘तात्या आता नाहीत, ते होते तेव्हा काही चुकले तर सांगायचे पण आता तात्या नाहीत काही चुकले तर मोठ्या मनानी मला सांगा, मी नक्की चूक सुधारेल’ असे सांगत सुसंस्कृतपणाचे दर्शन घडविले. 

उपस्थित जनसमुदायाला उत्सुकता होती ती विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या भाषणाची. ना.मुंडे यांनी आपल्या आक्रमक शैलीत सरकारच्या कारभाराचे वाभाढे काढले. माजीमंत्री बबनराव पाचपुते यांच्यावर सूचक शब्दांत हल्ला केला. 

खा. सुप्रियाताई सुळे यांनी नगर जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे तिन्ही आमदार कर्जमाफीच्या मागणीवर निलंबित झाले होते याचा आम्हाला अभिमान आहे. हे आमदार आमच्या पक्षाची ऊर्जा असून, आ. राहुल जगताप यांचे भाषण भावल्याचे सांगितले.

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या भाषणात जिल्ह्याच्या राजकारणाचा संदर्भ घेत आपली भूमिका मांडली.अहमदनगर लोकसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे. या मतदारसंघात निवडणूक लडविण्यासाठी अनेकांनी तयारी सुरू केली आहे. या मतदारसंघाच्या बदल्यात दुसरी जागा राष्ट्रवादीला द्यायची अशी चर्चा सुरू आहे. पण कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण ही जागा सोडणार नसून याठिकाणी राष्ट्रवादीच लढेल आणि जिंकेलही, असे ठणकावून सांगत डॉ. सुजय विखे यांच्या उमेदवारीला विरोध दर्शविला. 

श्रीगोंद्यातील हल्लाबोल आंदोलनाचे नियोजन हे महाराष्ट्रातील इतर आंदोलनापेक्षा भव्य होते. आ. जगताप हे तसे राजकारणात नवखेच  पण त्यांनी सभेसाठी खेचलेली गर्दी आणि केलेले परफेक्ट प्लॅनिंग पाहून आ. अजित पवार यांनी पुढचा मागचा विचार न करता आगामी विधानसभा निवडणुकीत आ. राहुल जगताप हेच उमेदवार असतील आणि तेच आमदार होतील असे स्पष्ट करत आपल्या थेट आणि बेधडक कार्यशैलीची चुणूक श्रीगोंदेकरांना दाखवून दिली. अर्थात विधानसभा निवडणुकीला अजून बराच कालावधी बाकी असताना आ. पवार यांनी विधानसभा निवडणुकीबाबतीत केलेले वक्तव्य अनेकांसाठी धक्कादायक होते. खुद्द आ.राहुल जगताप हेही आश्चर्यचकित झाले नसतील तरच नवल. 

2014 च्या विधानसभा निवडणुकीत राज्यात दोन्ही काँग्रेस समोरासमोर लढल्या.  पण राष्ट्रवादीचे नेते  शरद पवार यांच्या शब्दाला मान देत राज्य साखर संघाचे अध्यक्ष शिवाजीराव नागवडे यांनी आ. राहुल जगताप यांना समर्थन देत त्याना निवडून आणण्यासाठी खंबीर भूमिका घेतली. आ. राहुल जगताप यांना आमदार करत  माजीमंत्री बबनराव पाचपुते यांना धोबीपछाड दिली. अर्थात पवार यांनी दिलेला शब्द पाळत नागवडे यांना राज्य साखर संघाचे पद दिले.

तालुक्याचे आता पर्यतचे राजकारण हे नागवडे-पाचपुते यांच्याभोवती केंद्रीत होते. स्व. कुंडलिकराव जगताप यांनी तिसरा पर्याय निर्माण करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यात त्यांना फारसे यश आले नाही. पण राहुल जगताप यांच्या रुपाने तिसरा पर्याय तयार झाला. मात्र, राजकीय पटलावर आ. राहुल जगताप यांची फारशी ताकद नाही अशी चर्चा सातत्याने व्हायची. पण या हल्लाबोल आंदोलनाच्या निमित्ताने राजकीय जाणकारांचे, विरोधकांचे दावे फोल ठरवत  ‘हम भी कुछ कम नही’ हे दाखवून देण्याचा यशस्वी प्रयत्न केला आणि तालुक्यात तिसरा पर्याय आहे हेच दाखवून दिले. पण असे जरी असले तरी आ. राहुल जगताप यांच्यावर मोठी जबाबदारी असून, त्यांना आणखी सर्वसामान्यापर्यंत जावून काम करावे लागणार आहे हे मात्र नक्की.