नेवासा : प्रतिनिधी
अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे सेवानिवृत्तीचे वय पूर्ववत ठेवावे, असे साकडे तालुक्यातील अंगणवाडी सेविकांसह मदतनिसांनी आ. बाळासाहेब मुरकुटे यांना घातले. सर्व आमदारांना व आपल्या संघटनेतील नेत्यांना बरोबर घेऊन मुख्यमंत्री व ग्रामविकास, अर्थमंत्र्यांना भेटून चर्चा करू व तोडगा काढू, अशी ग्वाही आ. मुरकुटे यांनी यावेळी दिले.
तालुक्यातील सर्व अंगणवाडी सेविका व मदतनिसांनी आ. मुरकुटे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी विविध समस्या मांडल्या. शासनाने अंगणवाडी सेविकांचे निवृत्तीचे वय 60 केल्यामुळे राज्यातील सुमारे तेरा हजार अंगणवाडी कर्मचार्यांना सेवामुक्त करण्यात येणार आहे.
अल्पमानधनावर आतापर्यंत सेविका, मदतनीस यांनी बालविकास सेवा योजनेची अंमलबजावणी केली आहे. निवृत्तीचे वय घटविल्याने हजारो अंगणवाडी सेविका व मदतनीसांची उपासमार होणार आहे. याचा विचार लोकप्रतिनिधी नात्याने आ. मुरकुटे यांनी करावा, असे निवेदनात म्हटले आहे.
अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या तालुकाध्यक्ष मन्नाबी शेख,जिल्हा प्रतिनिधी माया जाजू यांनी सेविकांच्याअडी अडचणी सांगितल्या. यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर पेचे, नगरसेवक दिनेश व्यवहारे, डॉ. सचिन सांगळे, अलका दरंदले, प्रतिभा निमसे, शहनाज सय्यद, उषा पाखरे यांच्यासह अंगणवाडी सेविका मदतनीस मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.