Thu, Apr 25, 2019 18:30होमपेज › Ahamadnagar › दुचाकीच्या नंबरप्लेटवर रोमँटिक काव्यपंक्ती !

दुचाकीच्या नंबरप्लेटवर रोमँटिक काव्यपंक्ती !

Published On: Jan 31 2018 11:48PM | Last Updated: Jan 31 2018 11:29PM खेड: विजय सोनवणे 

दुचाकी वाहनांच्या मागील नंबरप्लेटवर क्रमांकाबरोबरच काव्यपंक्ती व चारोळ्या लिहिण्याचे प्रमाण वाढले आहे. याद्वारे कधीकधी आपल्या प्रेमाचा, तर कधी जीवनाचा, तर कधी आपण किती मौल्यवान आहोत, याचा देखावा या काव्यपंक्तिच्या सादरीकरणातून केला जात आहे.

तरुणांकडून अशा काव्यपंक्तीना वाहनाच्या नंबरप्लेटवर स्थान दिले जात आहे. त्यामुळे अनेकांच्या नजरा या नंबरप्लेटकडे वळत आहेत. प्रेमात पडलेल्या पण ते प्रेम व्यक्त न करू शकणार्‍या घाबरट प्रेमवीरांच्या दुचाक्या तर आवर्जून पाहण्यासारख्या आहेत. आपल्या भावनांना वाट करून देण्याचे प्रयत्न याद्वारे केले जात आहेत.त्यात सध्या सोशल मीडियाच्या व्हॉटससप, फेसबुक, इंन्स्टाग्राम आदीबरोबरच या चारोळ्या व काव्यपंक्तीच्या अ‍ॅप्स उपलब्ध असल्याने त्यात आणखीच भर पडत आहे. इंग्रजी अक्षरांपेक्षा मराठमोळ्या काव्यपंक्ती जास्त भाव खात असल्याने सध्या या चारोळ्या व काव्यपंक्तिचा मोठा आविष्कार दिसून येत आहे.

टीव्हीवर गाजत असलेल्या मालिका आणि त्यात जास्त प्रमाणात वापरण्यात येणार्‍या  संवादाचाही मोठा हातभार आहे.आपले वेगळेपण इतरांना कळावे,आपण किती प्रोफेशनल,आपल्याकडे किती बुद्धिमत्ता आहे याचे दर्शन व्हावे ही भावना त्यांच्या मनात रुजल्याचे यावरून दिसून येत आहे. वाहनांचे क्रमांक स्पष्टपणे दिसत नसल्यास तसेच फॅन्सी नंबरवर वाहतूक विभागाकडून कारवाई करण्यात येते याचेही भान तरुणाई आवर्जून ठेवत आहे.

त्यातच ठरते पर्सनॅलिटीचे प्रेझेंटेशन! 
कायद्याचे भान राखून फॅन्सी नंबर बनवून देणार्‍यांच्या कलेचीही प्रशंसा होते.तरूणाई आपल्या फेसबुक,व्हॉटसअ‍ॅप प्रोफाईल स्टेटसला जेवढे महत्व देते तेवढेच महत्त्व आपल्या दुचाकी नंबरप्लेटला देते. यातून आपल्या व्यक्तीमत्त्वाच्या प्रकटीकरणाचा खटाटोप करताना दिसत आहे.