Fri, Jul 19, 2019 15:42होमपेज › Ahamadnagar › कळशीभर सोन्याच्या आमिषाने लूट

कळशीभर सोन्याच्या आमिषाने लूट

Published On: Jul 06 2018 1:30AM | Last Updated: Jul 05 2018 11:20PMनगर : प्रतिनिधी

कळशी भरून सोने स्वस्तात देण्याचे आमिष दाखवून लूटमार करणार्‍या चौघा जणांच्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले. आरोपींकडून लुटलेले एटीएम कार्ड, आधार कार्ड, दीड लाख रुपये रोख रक्कम, बनावट सोने दाखविण्यासाठी वापरण्यात येणारी तांब्याची कळशी व त्या कळशीत पिवळ्या रंगाच्या पितळेच्या अंगठ्या, असा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती पोलिस अधीक्षक रंजन कुमार शर्मा यांनी दिली.

या आरोपींनी पाथर्डी पोलिस ठाण्याच्या हद्दीत अशाच प्रकारचे तब्बल सात व सोनई पोलिस ठाण्याच्या हद्दीत एक, असे 8 गुन्हे केले आहेत. टोळीतील इतर 7 ते 8 आरोपी फरार आहेत. याबाबत सविस्तर हकीकत अशी की, 28 जून रोजी ठाणे जिल्ह्यातल्या बदलापूर येथील व्यापारी मंदार रविकांत गरुड (26) यांना आरोपींनी पाथर्डी पोलिस स्टेशन हद्दीतील आव्हाडवाडी ते कोल्हार रस्त्यावर ‘स्वस्तात साडेतीन किलो सोने देतो’, अशी बतावणी करून बोलाविले. 

गरुड हे आले असता 7 ते 8 आरोपींनी गरुड यांच्याकडील 10 लाख 48 हजार रुपयांचे सोने व रोख रक्कम, एटीएम कार्ड, आधार कार्ड चोरून नेला. याबाबत पाथर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक दिलीप पवार यांना माहिती मिळाली की, अशा प्रकारचा गुन्हा करणारे आरोपी हे नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातल्या खेडले झुंगे गावी आहेत. हा गुन्हा गोविंद शालिंदर जाधव व सुदाम भागचंद चव्हाण (दोघेही रा. खेडले झुंगे, ता. निफाड जिल्हा नाशिक) यांनी केला असल्याचे समजले. त्यामुळे पोलिसांनी सापळा रचून शिताफीने या गुन्हेगारांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे विचारपूस केली असता पाथर्डीमधील गुन्हा हा मिरी येथील देवदान श्रीमंत काळे व त्याच्या साथीदारांच्या मदतीने केल्याची कबुली दिली. तसेच गुन्हा करण्याच्या पद्धतीचीही माहिती दिली.

त्यानुसार निरीक्षक पवार यांनी उपनिरीक्षक राजकुमार हिंगोले व दोन कर्मचार्‍यांना बनावट गिर्‍हाईक म्हणून खाजगी वाहनाने पाठविले. आरोपी सुदाम चव्हाण याला आरोपी परश्या विलास भोसले व देवदान श्रीमंत काळे या दोघांना फोनवरून ‘खोपोली येथील पार्टी सोने घेण्यासाठी येणार आहे’, असे सांगायला लावले. त्यानंतर आरोपी परश्या व देवदान यांनी पार्टीस बनावट सोने दाखवून लुटण्याची तयारी दर्शविली. निरीक्षक पवार यांनी सापळ्याचे नियोजन केले. उपनिरीक्षक हिंगोले व कर्मचार्‍यांना रवाना करून स्वतः पवार व पथकातील इतर कर्मचार्‍यांना खाजगी दुचाकीने मिरी ते शिराळ रस्त्यावर सापळा रचून थांबविले.

नियोजनाप्रमाणे उपनिरीक्षक हिंगोले यांच्याकडे आरोपी बनावट सोने दाखविण्यासाठी आले असता, हिंगोले यांच्या संदेशानुसार निरीक्षक पवार यांनी छापा टाकून दोघांना ताब्यात घेतले. एक आरोपी फरार झाला. अटक केलेल्यांमध्ये देवदान श्रीमंत काळे (वय 27) व अक्षय श्रीमंत काळे (वय 20, दोघेही रा. मिरी, ता. पाथर्डी) यांचा समावेश आहे. चोरी करतांना फसवणूक होत असल्याचे लक्षात आल्यानंतर हे भामटे व्यापार्‍यास मारहाण करून लुटत असत.

व्यापार्‍यांनी अशाप्रकारे आमिषांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन पोलिस अधीक्षक रंजन कुमार शर्मा यांनी केले आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकात उपनिरीक्षक श्रीधर गुट्टे, सुधीर पाटील, सुनील चव्हाण, उमेश खेडकर, योगेश गोसावी, दिगंबर कारखेले, मल्लिकार्जुन बनकर, दीपक शिंदे, रवी सोनटक्के, दत्तात्रय हिंगडे, भागीनाथ पंचमुख, राहुल हुसले, विशाल अमृते, योगेश सातपुते, रवींद्र कर्डीले, विजय ठोंबरे, विनोद मासाळकर, मेघराज कोल्हे, सविता खताळ, मनिषा पुरी, बबन बेरड आदींचा समावेश होता.