Sat, Jul 20, 2019 21:36होमपेज › Ahamadnagar › अपहरण व खूनप्रकरणी जन्मठेप

अपहरण व खूनप्रकरणी जन्मठेप

Published On: Apr 27 2018 12:51AM | Last Updated: Apr 26 2018 11:22PMश्रीरामपूर : प्रतिनिधी

तालुक्यातील मातापूर येथे मामाकडे आलेल्या मुलास 1 कोटी रुपयांच्या खंडणीसाठी पळवून नेऊन नंतर त्याचा खून करून पेट्रोल टाकून जाळणार्‍या तिघा आरोपींना काल श्रीरामपूर जिल्हा सत्र न्यायाधीश आर.डी. पाटील यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. 

गणेश गोरक्षनाथ चांदगुडे (रा. चासनळी, ता. कोपरगाव) असे या प्रकरणातील खून झालेल्या मुलाचे नाव आहे. तो तालुक्यातील मातापूर येथे सुनील दौंडे यांच्याकडे शिकण्यासाठी होता. श्रीरामपूर येथील बोरावके कॉलेजमध्ये तो शिकत होता. 12 मार्च 2015 रोजी मातापूर येथील मामाच्या घरून मित्राबरोबर सीईटीचा अभ्यास करण्यासाठी तो घराबाहेर पडला. 

मात्र, परत तो घरी आलाच नाही. त्यानंतर त्याच्या आईच्या मोबाईलवर 1 कोटीच्या खंडणीसाठी मेसेज आला होता. आरोपींनी 12 मार्च 2015 रोजी श्रीरामपूर येथून   नेवासा फाटा येथे जाऊन दारू पिऊन अपहरण केलेल्या गणेश यास नगर-औरंगाबाद रस्त्याने गंगापूर हद्दीत नेऊन त्याच्या डोक्यात दगड टाकून खून केला व अंगावर पेट्रोल टाकून त्यास पेटवून दिल्याचे निष्पन्न झाले.

याप्रकरणी आरोपी अजय दिनकर मोरे, पराग मच्छिंद्र पटारे व धीरज शंकर शिंदे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. काल श्रीरामपूर जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश आर.डी. पाटील यांनी वरील आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. मयताच्या आईच्या मोबाईलवर आलेले मेसेज व मयताकडे असलेल्या मोबाईल हॅण्डसेटचे आयएमईआय नंबरवरून या गुन्चा तपास लागला.  या खटल्यात सरकारतर्फे 26 साक्षीदारांच्या साक्ष नोंदविण्यात आल्या. अ‍ॅड. भानुदास तांबे व अ‍ॅड. प्रसन्न गटणे यांनी काम पाहिले.