Fri, Jan 18, 2019 20:16होमपेज › Ahamadnagar › पिता-पुत्राच्या खूनप्रकरणी १० जणांना जन्मठेप

पिता-पुत्राच्या खूनप्रकरणी १० जणांना जन्मठेप

Published On: May 10 2018 6:53PM | Last Updated: May 10 2018 6:36PMनगर : प्रतिनिधी

जामखेड तालुक्यातील काटेवाडी येथे शेतीच्या वादातून पितापुत्रांचा खून केल्याप्रकरणी दहा जणांना जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. यातील ५ जणांना मरेपर्यंत जन्मठेप सुनावण्यात आली आहे. 2014 मध्ये हे हत्याकांड झाले होते.

आरोपी राजेंद्र महादेव बहीर,  रघुनाथ  बहीर, कैलास बहीर, सोमनाथ बहीर, संदीप बहीर यांना जन्मठेप व प्रत्येकी 15 हजार रुपये दंडाची शिक्षा तर  महादेव बहिर, सुखदेव बहीर शहाजी बहीर, मल्हारी बहीर, दादा बहीर यांना मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश हेमंत देशपांडे यांनी आज (गुरुवार) हा निकाल दिला. 

याबाबत अधिक माहिती अशी की, शेत जमिनीच्या वादातून आरोपींनी भावकीतीलच आसाराम यशवंत बहिर व त्यांचा मुलगा नितीन यांची हत्या केली होती. तर जमावाने मयत आसाराम यांच्या पत्नी गयाबाई यांना जबर मारहाण करत बरगड्या तोडल्या होत्या. याप्रकरणी न्यायालयात आज सुनावणी झाली असता, न्यायालयाने यातील दोषीना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. सरकारी पक्षाच्यावतीने अतिरिक्त सरकारी अभियोक्ता अनिल घोडके यांनी काम पाहिले. जामखेड पोलिस ठाण्याचे तत्कालीन पोलिस निरीक्षक संजय पाटील हे गुन्ह्याचे तपासी अधिकारी होते.