Tue, Jul 23, 2019 16:49होमपेज › Ahamadnagar › अल्पवयीन मुलीचा खून करणार्‍या आरोपीस जन्मठेप

अल्पवयीन मुलीचा खून करणार्‍या आरोपीस जन्मठेप

Published On: Feb 22 2018 1:30AM | Last Updated: Feb 22 2018 1:30AMनगर : प्रतिनिधी

लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत असलेल्या अल्पवयीन मुलीचा खून केल्याप्रकरणी आरोपी बाबासाहेब मिठू शिंदे (वय 32, रा. कात्रड शिवार, राहुरी, जि. नगर) यास येथील जिल्हा सत्र न्यायाधीश सत्यनारायण नावंदर यांनी जन्मठेप व 50 हजारांच्या दंडाची शिक्षा सुनावली. 

याबाबत सविस्तर हकीगत अशी की, 27 फेब्रुवारी 2016 रोजी कात्रड शिवारातील गुंजाळे तलावाच्या बाजूला डोंगराजवळ आशाबाई बाबाजी आवारे यांची जमीन आहे. त्या विहिरीवर मोटार पाहण्यासाठी बाबाजी आवारे गेले असता, त्यांना विहिरीत पाण्यात मुलीचे प्रेत तरंगताना आढळून आले. आवारे यांनी ही माहिती राहुरी पोलिसांना दिली. या प्रकरणी प्रारंभी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. सहाय्यक फौजदार श्रीधर पालवे यांनी तपास केला.

औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात शवविच्छेदन केले असता, सदर अल्पवयीन मुलीचा खून झाल्याचे निष्पन्न झाले. डोक्यात टणक वस्तूने मारहाण केल्याने तिचा मृत्यू झाला. त्यानंतर तिचा मृतदेह विहिरीत टाकल्याने वैद्यकीय अहवालात नमूद करण्यात आले होते. तिच्या आई-वडिलांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. आरोपी बाबासाहेब शिंदे हा या मुलीसोबत कोपी करून राहत होता. त्याला दारूचे व्यसन होते. मूलबाळ होत नसल्याने शिंदे सतत या मुलीशी भांडणतंटा करत असे. त्यातून हा प्रकार घडला. तिच्या आई-वडिलांनी दिलेल्या माहितीवरून राहुरी पोलिस ठाण्यात आरोपी शिंदेविरुद्ध  302, 201, 376, 363, 366 तसेच बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा कलम 3 व 4 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. 

पोलिस उपनिरीक्षक बालाजी शेंगेपल्लू यांनी या गुन्ह्याचा तपास करून न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते.  जिल्हा सत्र न्यायाधीश सत्यनारायण नावंदर यांच्यासमोर या खटल्याची सुनावणी झाली. सरकार पक्षातर्फे एकूण 12 साक्षीदार तपासण्यात आले. यात मुलीच्या आई-वडिलांची साक्ष महत्त्वाची ठरली. वैद्यकीय अहवाल, तपासी अधिकारी यांच्या साक्षीही महत्त्वपूर्ण ठरल्या. आरोपी शिंदेविरुद्ध खून व पुरावा नष्ट केल्याचा गुन्हा सिद्ध झाला. खुनाबद्दल जन्मठेप व 40 हजार रुपये दंड तर पुरावा नष्ट केल्याबद्दल भादंवि कलम 201 प्रमाणे आरोपीस 3 वर्षे सक्तमजुरी व दहा हजार रुपये दंड ठोठावण्यात आला. सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता अ‍ॅड. मंगेश दिवाणे यांनी काम पाहिले.