होमपेज › Ahamadnagar › १३ प्रकल्पांचा पाणीसाठा खालावला

१३ प्रकल्पांचा पाणीसाठा खालावला

Published On: May 07 2018 2:00AM | Last Updated: May 07 2018 12:28AMअकोले : प्रतिनिधी

अकोले तालुक्यातील भंडारदरा व निळवंडे धरण वगळता उर्वरित लघुप्रकल्पांमध्ये पाण्याने चांगलाच तळ गाठला आहे. ही दोन मोठी धरणे वगळता इतर 13 प्रकल्पांमध्ये सद्यस्थितीला 804 दशलक्ष घनफूट पाणीसाठा शिल्लक असला, तरी मृतसाठा वगळता अत्यल्प पाणी पिण्यासाठी उपलब्ध होणार आहे. अकोले तालुक्यात सध्या दोन गावांना दोन टँकरद्वारे पिण्याचे पाणी पुरवले जात असून, आणखी दोन गावांकडून टँकरची मागणी आली आहे.

मे महिन्यात उष्णतेचा कडाका चांगलाच वाढत असून यापुढील काळात पाण्याची टंचाई काहीशी वाढण्याची शक्यता असून लघप्रकल्पांमधील पाणी काटकसरीने वापरण्याची गरज आहे. प्रवरा खोरे वगळता तालुक्याच्या उर्वरित सर्वच भागात पाण्याची उपलब्धता नगण्य असून प्रशासनाने याबाबत तातडीने आढावा घेण्याची गरज आहे.

अकोले तालुक्यात भंडारदरा, निळवंडे या दोन मोठ्या धरणांसह आढळा, पिंपळगाव खांड हे दोन मध्यम प्रकल्प, तर वाकी, टिटवी, पाडोशी, सांगवी, आंबित, कोथळे, शिरपुंजे, बलठण, घोटी शिळवंडी, बेलापुर, बोरी हे लघुप्रकल्प आहेत. या सर्व धरणांची एकूण पाणी साठवण क्षमता 22 हजार 398 दशलक्षघनफूट असून सध्या या सर्व धरणांमध्ये अवघे 8 हजार 182 दशलक्ष घनफूट पाणी शिल्लक आहे. यापैकी भंडारदरा व निळवंडे धरणांमधील सध्या शिल्लक असलेले 7378 दशलक्ष घनफूट पाणी वगळता उर्वरित सर्व प्रकल्पांमध्ये केवळ 804 दशलक्ष घनफूट पाणी शिल्लक असून यामधून अचल साठा 265 वगळता वापरण्यायोग्य अवघे 539 दशलक्ष घनफूट पाणी शिल्लक आहे. उन्हाळ्याचा अजून दीड महिना कालावधी शिल्लक आहे. उन्हाचा दाह दिवसागणिक वाढत आहे, त्यामुळे पिकाबरोबरच पिण्याच्या पाण्याची मागणीही वाढू लागली आहे. 

प्रवरा खोर्‍यात पाण्याची उपलब्धता समाधानकारक असली तरी उर्वरित तालुक्यात मात्र स्थिती गंभीर आहे. याठिकाणचे पाणीस्त्रोत आटले आहेत. विहिरींनी तळ गाठला आहे. पिके उन्हाने कोमेजली आहेत. जनावरांना हिरव्या चार्‍याचा तुटवडा जाणवू लागल्याने दूधउत्पादनावरही परिणाम दिसू लागला आहे. 

तालुक्यातील मण्याळे व मुथाळणे या दोन गावांना दोन टँकरद्वारे पिण्याचे पाणी पुरविले जात आहे. पळसुंदे व पाचनई येथील ग्रामस्थांकडून टँकरची मागणी आली आहे. प्रशासनाने प्रस्ताव तयार केला आहे. तालुक्यात आवश्यक त्या ठिकाणी खासगी विहिरीही अधिगृहित करण्यात आल्या आहेत. तालुक्यातील सर्व लघु प्रकल्पांमध्ये पाण्याने तळ गाठल्याने शिल्लक असलेले पाणी शेतीसाठी उचलले जाऊ नये, म्हणून या प्रकल्पांवरील सर्व इलेक्ट्रिक मोटारींची वीज खंडित करण्यात आली आहे. सध्या निळवंडे धरणाचे शेतीसाठी दीर्घ आवर्तन चालू आहे. आढळा धरणाचे आवर्तनही चालू आहे. या खोर्‍यात पाण्याचे योग्य नियोजन करण्याची गरज आहे.