Fri, Jul 19, 2019 17:43होमपेज › Ahamadnagar › साखर उद्योगाला सेवाकरातून वगळा : मुरकुटे

साखर उद्योगाला सेवाकरातून वगळा : मुरकुटे

Published On: Jul 05 2018 1:36AM | Last Updated: Jul 05 2018 12:45AMश्रीरामपूर : प्रतिनिधी

आर्थिक संकटात सापडलेल्या साखर उद्योगाला सावरण्यासाठी केंद्राने जाहीर केलेले साडेआठ हजार कोटी रुपयांच्या पॅकेजचा तसेच उत्पादित साखरेच्या 16 टक्के साखर बफर स्टॉक करण्याचा निर्णय स्वागतार्ह आहे. तथापी केवळ पॅकेज देऊन भागणार नसून या उद्योगाला वस्तू व सेवाकरातून वगळावे तसेच साखरेला योग्य किंमत मिळावी, यासाठी केंद्राने किमान 50 लाख टन साखरेचा बफर स्टॉक करावा, त्याचप्रमाणे इथेनॉल निर्मितीला प्रोत्साहन व साखर उद्योगाच्या सक्षमीकरणासाठी शासनाने दूरगामी व सक्षम धोरणाचे पाठबळ द्यावे, अशी प्रतिक्रीया ऑल इंडिया डिस्टिलर्स असोसिएशनचे माजी अध्यक्ष, माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी व्यक्त केली. 

मुरकुटे म्हणाले की, साखरेला उत्पादन खर्चापेक्षा अत्यंत कमी भाव मिळत असल्याने साखर काखानदारी आर्थिक अरिष्टात सापडली आहे. देशातील बहुतांश साखर कारखाने साखरेला वाजवी दर मिळत नसल्याने तोट्यात गेले आहेत. या पार्श्‍वभुमीवर केंद्राने साखर उद्योगाला जाहीर केलेल्या साडेआठ हजार कोटी रुपयांचे पॅकेजचे आपण स्वागत करतो. बाजारपेठेत साखरेचे भाव स्थिर ठेवण्यासाठी विक्रीवर नियंत्रण आणून शासनाने कोटा पद्धतीचा अवलंब तसेच प्रतिटन  55 रुपये अनुदान शेतकर्‍यांचे खात्यावर जमा करण्याचा निर्णय देखील योग्य असल्याचे ते म्हणाले. तथापि एवढ्या उपाययोजनांनी साखर उद्योग सावरेल अशी स्थिती नाही. शासनाने साखरेला प्रतिकिलो 29 रुपये असा भाव ठरवून दिला आहे. उत्पादन खर्चाचा विचार करता, इंडियन शुगर मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनने शिफारस केल्यानुसार साखरेला किमान प्रती किलो रुपये 33 इतका भाव मिळणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे पर्यावरणपूरक इंधन असलेल्या इथेनॉल निर्मितीला चालना द्यावी, अशी मागणी मुरकुटे यांनी केली.