Thu, Feb 21, 2019 09:08होमपेज › Ahamadnagar › ऊसतोड कामगार चळवळीचा नेता हरपला

ऊसतोड कामगार चळवळीचा नेता हरपला

Published On: Jun 18 2018 1:08AM | Last Updated: Jun 17 2018 10:08PMपाथर्डी : सुभाष केकाण

स्व. गोपीनाथ मुंडे व माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे यांच्यासोबत संघर्ष करत ऊसतोडणी कामगारांचे नेतृत्व करणारे माजी आ. दगडू पा. बडे यांच्या निधनाने ऊसतोड कामगार चळवळीचा नेता हरपला आहे. ऊसतोडणी कामगारांसाठी रस्त्यावर उतरुन बडे यांनी संघर्ष केला होता. असा संघर्षशील नेता हरपल्याचे दु:ख तालुका विसरू शकणार नाही. 

शुक्रवारी दगडू बडे यांचे निधन झाल्यानंतर तालुक्यातील ऊसतोडणी कामगार पोरका झाला आहे. बडे यांनी आपल्या 1999 ते 2004 या आमदारकीच्या काळात सामान्य मानसाला न्याय देण्याचे काम केले. साधी रहाणी, उच्च विचार सरणी हे त्यांचे वैशिष्ट्य होते. ते विधानसभेत आमदार म्हणून निवडून गेल्यावर देखील कायम सामान्य व ऊसतोड कामगारांच्या प्रश्‍नाकडे लक्ष देत राहीले. त्यांनी सामान्य माणूस केंद्रस्थानी मानला. त्यांनी विधानसभेच्या काळात कधी पी.ए, ऑफीस, अपॉयमेंट हे सोपस्कर ठेवले नाहीत. आपण उसतोडणी कामगारांचे प्रतिनिधी असल्याने ते कायमच सामान्य माणसात राहिले. बडे यांचे माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे व स्व. गोपीनाथ मुंडे यांचेशी व्याह्याचे नाते असल्याने तालुक्याच्या राजकारणात ते केंद्रस्थानी राहिले.

त्यांचा स्पष्टवक्तेपणा असल्याने राजकारणातील वरिष्ठ पदाधिकारी त्यांच्याशी अनावश्यक बोलणे टाळायचे. त्यांच्या अंत्यविधीस विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. बडे यांच्या जाण्याने तालुक्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. ऊसतोडणी कामगारांसाठी संघर्ष करणारा नेता आता नव्याने निर्माण होणे शक्य नसल्याने अशा नेत्यांची खंत तालुक्याला कायमच राहणार आहे. सुमारे दहा महिन्यांपूर्वीच माजी आ. राजीव राजळे यांच्या निधनाने तालुका शोकसागरात होता. त्यापाठोपाठच दगडू बडे यांचे निधन झाल्याने तालुक्यातील जनता दुःखात आहे.