Fri, Jul 19, 2019 00:56होमपेज › Ahamadnagar › जयंतरावांची उणीव भासू देणार नाही

जयंतरावांची उणीव भासू देणार नाही

Published On: Feb 25 2018 1:15AM | Last Updated: Feb 24 2018 11:33PMश्रीरामपूर : प्रतिनिधी

जयंतराव ससाणे यांच्या अकाली निधनाने जिल्हा नव्हे तर राज्य हळहळले आहे. सामान्यांमध्ये वावरणारा व प्रस्थापितांविरूद्ध लढणार्‍या या नेत्याला जनतेचा पाठिंबा होता. त्यांनी श्रीरामपूर शहर व तालुक्याची विकासाची घडी बसविली आहे. ती विस्कटू देऊ नका, मी तुम्हाला जयंतरावांची उणीव कधीही भासू देणार नाही, असे आश्‍वासन विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्‍त केले.

माजी आ. जयंतराव ससाणे यांच्या निधनानंतर काल येथील मुख्य रस्त्यावर झालेल्या अविस्मरणीय शोकसभेस मार्गदर्शन करतांना ना. विखे बोलत होते. ते म्हणाले ससाणे व मी सुख, दु:खात बरोबर राहिलो आहोत. अनेकांनी आमच्यात मतभेद निर्माण करण्याचा प्रयत्न केला. परंतु आमचे मतभेद झाले नाही. माझा भाऊ गेल्याचे दु:ख झाले असले तरी त्यांच्या स्मृती चिरंतन ठेवण्यासाठी येथील विकासाचे काम करू. या कामातून त्यांच्या स्मृती जिवंत राहतील.

पालकमंत्री ना. राम शिंदे म्हणाले की, प्रतिकूल परिस्थितीत स्वत:चे नाव राज्य व देशात पोहचविणारे जयंतराव ससाणे दीन दलितांचे आधार होते. विविध प्रश्‍नासाठी झटणारा सच्चा दिलदार माणूस हरपल्याचे दु:ख आहे.

माजीमंत्री आ. बाळासाहेब थोरात म्हणाले की, श्रीरामपूरच्या जडणघडणीमध्ये मोठे योगदान असलेले जयंत ससाणे म्हणजे दूरदृष्टीचे गमक होते. अनेक योजना यशस्वीपणे राबविणारे जयंतराव राज्यकर्त्यांमधील समन्वयक होते. स्व. विलासराव देशमुख यांचे अति सख्य असणारे ससाणे उपकाराची जाणीव ठेवणारे नेते होते. त्यांच्या विविध आठवणी म्हणजे भविष्यातील विकासाची जंत्री असल्याने ‘आठवणी जयंतरावांच्या’ अशी पुस्तक निर्मिती करण्याचे आवाहन केले. 

यावेळी कॉ. श्रीधर आदिक, रमेश कोठारी, प्रकाश ढोकणे, माजी आ. संभाजीराव फाटके, सुभाष त्रिभूवन, सचिन बडदे, वंदना मुरकुटे, अरुण धर्माधिकारी, अ‍ॅड. विजय बनकर, बाळासाहेब गायकवाड, माजी आ. माणिकराव कोकाटे, डॉ. महेश क्षीरसागर, राजेंद्र लोंढे, बाबा शिंदे, रमण मुथा, मुकुंद बोडखे, रवी भागवत, देविदास देसाई, सरवरअली सय्यद, लुकस दिवे, नागेश सावंत, मा. खा. भाऊसाहेब वाकचौरे, सुभाष जंगले, डॉ. बाबूराव उपाध्ये, बाळासाहेब भोसले, सिस्टर सरोज, मिनानाथ पांडे, अशोक गायकवाड, प्रकाश चित्ते, डॉ. बाळासाहेब पवार, जगजितसिंग चूग, लहू कानडे, हेमंत ओगले, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अविनाश आदिक, अविनाश आपटे, शिवसेना जिल्हाध्यक्ष रावसाहेब खेवरे, जिल्हा बँक अध्यक्ष सीताराम गायकर, माजी आ. दौलतराव पवार, माजी आ. अनिल आहेर, माजीमंत्री शोभा बच्छाव, माजीमंत्री आण्णासाहेब म्हस्के आदींचे श्रद्धांजलीपर भाषणे झाली. सूत्रसंचालन संतोष मते यांनी केले  तर पसायदानाने सांगता झाली.