Tue, Mar 19, 2019 09:17होमपेज › Ahamadnagar › कर्जतमध्ये उसाच्या क्षेत्रात मोठी वाढ

कर्जतमध्ये उसाच्या क्षेत्रात मोठी वाढ

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

कर्जत : प्रतिनिधी

कर्जत तालुक्यात सध्या उसाच्या क्षेत्रात लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे कर्जतची दुष्काळी तालुका, अशी ओळख हळूहळू पुसत आहे. आज घडीला अडसाली, खोडवा, सुरू आणि नवीन ऊस लागवड पाहता, ऊस क्षेत्राने 10 हजार हेक्टरचा आकडा ओलांडला आहे. त्यात अंबालिका कारखान्याचा मोठा वाटा आहे. उसाच्या दराचा प्रश्‍न कायम असला, तरी तालुक्यातील जिराईत भागातील शेतकरी आता मोठ्या प्रमाणात उसाकडे वळला आहे. 

कर्जत तालुका हा भीमा, सीना व कुकडी नद्यांच्या लाभक्षेत्राखाली येतो. मात्र सततच्या दुष्काळामुळे तालुक्यातील सीना पट्ट्यातील ऊस लागवड बंद करण्यात आली होती. पावसाचे प्रमाण दिवसेंदिवस प्रमाण कमी होत आहे, तसेच सीना धरण भरले जात नव्हते. त्यातच कालवाही काही ठिकाणी खराब झाला होता. त्यामुळे शेवटच्या भागास पाणी मिळत नव्हते. त्यामुळे  निमगाव गांगर्डा या गावापासून ते माहिजळगाव, पाटेगाव, मलठण, दिघी या शेवटच्या भागामध्ये असलेले उसाचे बागायत क्षेत्र नष्ट झाले. त्यामुळे बागायत भाग जिरायत झाला. 

तालुक्यातील 30 हजार हेक्टर क्षेत्र कुकडी अंतर्गत येते. मात्र या भागाला पाणी मिळण्याची कोणतीच हमी नाही. प्रत्येक वेळी आंदोलन करावे लागते. तेव्हा पाणी मिळते. भाजपचे सरकार सत्तेवर आल्यावर कुकडीच्या पाण्याचा प्रश्‍न काही प्रमाणात सुटला आहे. 

भीमा नदीच्या परिसरावर मदार

कर्जत तालुक्यात भीमा नदी पट्ट्यात सिद्धटेक, दुधोडी, भांबोरा, गणेशवाडी, बेर्डी, खेड, शिंपोरा, बाभूळगाव यासह परिसरात उसाचे क्षेत्र पहिल्या पासून टिकून आहे. दोन वर्षांपूर्वी पडलेला दुष्काळ व बेसुमार वाळू उपशामुळे या परिसरातील नदीपात्रात पाण्याचा थेंब राहीला नव्हता. 

त्यामुळे अनेकांचा ऊस जळून गेला होता. मात्र यावर्षी चांगला पाऊस झाल्याने उसाचे क्षेत्र पुन्हा वाढले आहे. तालुक्यातही जलयुक्तची कामे झाली. तसेच पाऊसही चांगला झाला आहे. त्यामुळे उसाच्या क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. कर्जत तालुक्यात उसाचे क्षेत्र कमी होते.