Fri, Apr 26, 2019 03:57होमपेज › Ahamadnagar › भिंगार नाल्याची गाळपेर परस्पर विकली

भिंगार नाल्याची गाळपेर परस्पर विकली

Published On: Jun 10 2018 1:47AM | Last Updated: Jun 09 2018 11:04PMनगर : प्रतिनिधी

भिंगार नाल्याच्या गाळपेर जागेत अतिक्रमण करून बनावट दस्ताऐवज, कागदपत्रे तयार करून शासकीय जमीन परस्पर दुसर्‍यांना विकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सन 1966 पासून हा गैरप्रकार सुरू होता. याप्रकरणी लोकायुक्तांच्या आदेशानंतर जिल्हाधिकार्‍यांनी चौकशी केली. त्यानंतर नालेगावच्या मंडलाधिकार्‍यांनी शुक्रवारी (दि. 9) रात्री कँप पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे.

कोट्यवधी रुपयांची जमीन लाटून त्याची विक्री करणार्‍यांमध्ये नगरमधील बड्या व्यक्तींचा सहभाग असल्याचे महसूल विभागाने केलेल्या चौकशीतून निष्पन्न झाले आहे. याबाबत मंडलाधिकारी राजेंद्र आंधळे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, भिंगार नाला येथील सर्व्हे नंबर 135 व 136 लगतच्या गाळपेर क्षेत्रावर मंजूर करण्यात आलेले रेखांकन, सुधारित रेखांकनानुसार पारीत करण्यात आलेल्या बिगरशेती आदेश, बनावट व खोटे अभिलेख तयार करून गाळपेर जमिनीची खरेदी विक्री केल्याबाबतची तक्रार शाम नामदेव कोके यांनी राज्याच्या लोकायुक्तांकडे केली होती. 1 डिसेंबर 2016 रोजी लोकायुक्तांसमोर झालेल्या सुनावणीत लोकायुक्तांनी चौकशी करून तक्रारीत तथ्य असल्यास फिर्याद दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार चौकशी करून जिल्हाधिकार्‍यांनी गाळपेर जमिनीबाबत गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिला आहे. 

सन 1965/66 च्या एका उतार्‍यावर कब्जेदार म्हणून सदाशिव निसळ यांच्या नावाची नोंद आहे. तरीही सदर जमीन दादा ननुभाई शेख यांना मंजूर करण्यात आल्याची बाब संशयास्पद आहे. ही जमीन शेख यांना लिलावाद्वारे मिळालेली असताना त्यांचे वारसदार अभिनामी शेख व मोहीद्दीन शेख यांनी ही जमीन कायदेशीर मालकीहक्क नसताना विक्री करून शासनाची फसवणूक केल्याचे सकृतदर्शनी आढळून येते. मे. सारस एन्टरप्रायसेस फर्मचे मालक व भागीदार महेंद्रकुमार कटारिया, शरद मुथा यांनी गाळपेर जमिनीच्या मालकी हक्काबाबत खात्री न करता ती खरेदी करून बेकायदेशीरपणे विक्री केली. तत्कालिन दुय्यम निबंधकांनी खरेदी-विक्री नोंदविताना अभिलेखाची तपासणी न करताच व्यवहार नोंदविल्याचे दिसून येते. 

सन 1982 रोजी मूळ मंजूर रेखांकनानुसार जागेचे सुधारित रेखांकन सादर करताना त्यात शरद मुथा व अर्चना शहा यांनी गैरप्रकार केल्याचे दिसून येते. त्यातील नोंदीत तफावत आढळून येत आहे. सन 1988 रोजी सर्व्हे नंबर 135 व 136 पैकी 53 आर क्षेत्राचा स्वतंत्र सातबारा उतारा तयार करण्यात आला होता. कायदेशीर अधिकारी नसताना शरद मनसुखलाल मुथा, महेंद्र नेमीचंद कटारिया, मोहीद्दीन जमादार शेख यांनी खोट्या व बनावट कागदपत्रांच्या आधारे शासकीय जमिनीची परस्पर विक्री करून शासनाची फसवणूक केल्याचे प्रथम दर्शनी आढळून येते, असे फिर्यादीत म्हटले आहे. 

सन 1966 पासून आतापर्यंत माळीवाडा हद्दीतील भिंगार नाला गाळपेराची सर्व्हे नंबर 135 व 136 जमीनीचे बनावट व खोटे अभिलेख तयार केले,  बनावट कागदपत्रांच्या आधारे अकृषिक परवानगी मिळवून गाळपेर जमिनीची बेकायदेशीरपणे दुसर्‍या व्यक्तींना विक्री करून शासनाचे नुकसान केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी कँप पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप पाटील हे करीत आहेत.