Fri, Jul 19, 2019 20:04होमपेज › Ahamadnagar › नान्नजमध्ये चोरीत लाखाचा ऐवज लंपास

नान्नजमध्ये चोरीत लाखाचा ऐवज लंपास

Published On: May 18 2018 1:14AM | Last Updated: May 17 2018 10:44PMनान्नज : वार्ताहर 

जामखेड तालुक्यातील नान्नज येथील शिवाजी नगरमध्ये राहणारे हनुमान रामदास मोहळकर यांच्या घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून कपाटातील  सोन्याचे दागिने व  रोख रक्कम असा एकूण एक लाख रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. भरवस्तीमध्ये झालेल्या या धाडशी चोरीमुळे नागरिकांत दहशतीचे वातावरण पसरले आहे. 

16 मे च्या मध्यरात्री सात ते आठ चोरट्यांनी प्रथम गणेश पेढेतील अमोल पंडीत याच्या घराचे दार तोडण्यास सुरूवात केली. दरवाजा  तोडण्याचा आवाज अमोल पंडीत यांच्या  कानी पडला. त्यांनी गच्चीवरून खाली पाहिले असता त्यांना  घरासमोर सात ते आठ चोरटे उभे असल्याचे दिसले. पंडीत यांनी आरडाओरड सुरू केल्याने परिसरातील नागरिक जागे झाले.  चोरट्यांनी लगेच पळ काढला. पंडीत यांचे सोने चांदीचे दुकान आहे. मात्र, येथील  चोरट्यांचा डाव अयशस्वी ठरला. नागरिकांना चकवा देत चोरट्यांनी आपला मोर्चा शिवाजी नगरमधील  हनुमान रामदास मोहळकर यांच्या घराकडे वळविला. 

यावेळी हनुमान मोहळकर, त्यांची आई  व, दोन बहिंनी हे सर्व जण गच्चीवर झोपले होते. हनुमान मोहळकर  यांच्या घराच्या ग्रीलच्या दरवाजाचे कुलूप तोडून कपाटातील सोन्याचे दोन गठंण, दोन झुब्बे, दोन फुलाचे जोड व रोख रक्कम व दोन हजार रुपये असा एकूण एक लाखांचा ऐवज लंपास केला. कपाट तोडण्याच्या आवाजाने हनुमान मोहळकर जागे झाले. वरच्या मजल्यावरून ते खाली आले. त्यावेळी घरात चार व दारात  तीन असे एकूण सात ते आठ चोरटे पाहिले. या चोरट्यांनी हनुमान मोहळकर यांच्यावर अचानक दगडफेक करत घरातील मुद्देमाल घेऊन पोबारा केला. याबाबत हनुमान मोहळकर व अमोल पंडीत या दोघांनी  जामखेड पोलिसात  तक्रारी दाखल केल्या असून, भरवस्तीमध्ये झालेल्या या धाडसी चोरीमुळे नागरिकांत दहशतीचे वातावरण पसरले आहे.पोलिसांनी या परिसरात गस्त घालावी, अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे. गावात अनोळखी नागरिक दोन ते तीन दिवस राहतात. त्यांना  गावातील काही नागरिक आश्रय देखील देतात. अशा  घटना घडताच ते पसार होतात.  अशी दबक्या आवाजात चर्चा चालू आहे.