Wed, Mar 20, 2019 08:32होमपेज › Ahamadnagar › जिल्ह्यात 125 प्रजातींचे लाखभर पक्षी

जिल्ह्यात 125 प्रजातींचे लाखभर पक्षी

Published On: Mar 04 2018 1:46AM | Last Updated: Mar 04 2018 12:56AMनगर : प्रतिनिधी

जिल्हाभरात करण्यात आलेल्या पक्षीगणनेत 125 पेक्षा अधिक प्रजातींचे एकूण 95 हजार 121 पक्षी आढळून आले आहेत. या पक्षीगणनेत 65 प्रौढ निरीक्षकांसह 875 विद्यार्थी सहभागी झाले होते. जिल्हाभरातील 266 ठिकाणी 1 जानेवारी ते 15 फेब्रुवारी या दीड महिन्याच्या कालावधीत ही पक्षीगणना करण्यात आली. इतक्या व्यापक प्रमाणात पक्षीगणना करणारा नगर हा राज्यातील पहिला जिल्हा ठरला आहे. 

बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटीचे सदस्य पक्षीअभ्यासक जयराम सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली व शैक्षणिक विचारधारा समूहांच्या सहकार्याने सलग नवव्या वर्षी संपूर्ण जिल्ह्यात पक्षीगणना पार पडली. या वर्षीसुद्धा सर्व तालुक्यांतून या पक्षीगणनेत सहभागी होणार्‍या हौशी निसर्गप्रेमींच्या सहभागाचा आलेख चढता राहिला. सदर उपक्रमाचे जिल्हा उपवन संरक्षक अधिकारी एम.आदर्श रेड्डी व जिल्हा शिक्षणाधिकारी रमाकांत काठमोरे यांनी कौतुक केले आहे. तसेच पक्षगणनेत सहभागी झालेल्या सर्वांना प्रमाणपत्र देण्याचे आश्‍वासन शैक्षणिक विचारधारा समूहाचे प्रशासक एस.के.पवार यांनी दिले आहे. शिवकुमार वाघुंबरे, डॉ.अशोक कराळे, अनमोल होन, सुनील वाघुंबरे यांनी जिल्ह्यात ठिकठिकाणी पक्षीगणनेदरम्यान छायाचित्रण केले.

गेल्या वर्षी चांगल्या प्रमाणात पाऊस झाल्याने व जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या तलावांत अजूनही भरपूर पाणीसाठा असल्याने पक्ष्यांच्या वैविध्यपूर्ण प्रजाती निरीक्षकांना पाहावयास मिळाल्या. युरोपखंडातून हजारोंच्या संख्येने येणार्‍या पळसमैनांनी जिल्ह्यात ठिकठिकाणी निसर्गप्रेमींचे लक्ष वेधले. त्यांची यावर्षी सर्वाधिक 36 हजार 34 इतकी नोंद झाली. याबरोबरच भुवई, तलवारबदक यांच्यासह विविध प्रजातींचे बदक, चमचचोचा, विविध प्रजातींचे करकोचे, चिखल्या, धोबी अशा विविध परदेशी पक्ष्यांनी जिल्ह्यात हजेरी लावलेली असताना, दरवर्षी कमी अधिक प्रमाणात येणारे रोहित व पट्टेरी हंस मात्र गणनेदरम्यान यंदा कुठेही आढळले नाहीत. यावर्षी चांदबिबी परिसरात आढळून आलेले दुर्मिळ चट्टेरी वनघुबड, शेवगाव परिसरात आढळलेला चष्मावाला, वृद्धेश्‍वर जंगलातील कृष्णथिरथीरा व इतर काही ठिकाणी आढळलेले निळामाशीमार, निखार, व्याध, रक्तचंचु, सायबेरीयन गप्पीदास, अशा एकूण आठ पक्ष्यांची जिल्ह्यात पहिल्यांदाच नोंद झाली आहे.