Wed, May 22, 2019 14:37होमपेज › Ahamadnagar › राजकारणामुळे सामान्यांचे नुकसान

राजकारणामुळे सामान्यांचे नुकसान

Published On: Aug 07 2018 12:58AM | Last Updated: Aug 07 2018 12:11AMसंगमनेर : प्रतिनिधी

शिर्डी विधानसभा मतदार संघात समाविष्ट असलेल्या 26 गावांच्या विकासात आपण कुठेही कमी पडलो नाही. पण सर्वसामान्य माणसांच्या आडलेल्या कामांसाठी व्हाया संगमनेर घेऊन जाणार्‍या अनेक मधल्या माणसांनीच गावपातळीवर घोटाळे निर्माण करून विकासात अडथळे आणण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यांच्या राजकारणामुळे सामान्य माणसाचे नुकसान होत आहे याचे भान ठेवा, अशी टीका विरोधी पक्षनेते  राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. 

संगमनेर तालुक्यातील कोल्हेवाडी येथे मतदारसंघातील सुमारे 2 हजार 100 लाभार्थ्यांना मोफत उज्ज्वला गॅस कनेक्शनचे वितरण विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जनसेवा मंडळाचे अध्यक्ष भास्करराव दिघे होते. कार्यक्रमास  विखे कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील, उपाध्यक्ष कैलास तांबे, बापूसाहेब गुळवे, दिलीपराव शिंदे, पंचायत समिती सदस्य गुलाबराव सांगळे सरपंच निमोणचे सरपंच संदिप देशमुख, प्रांताधिकारी भागवत डोईफोडे, तहसीलदार रावसाहेब सोनवणे, मोहनराव वामन  उपस्थित होते.

ना.विखे म्हणाले की, राजकीय क्षेत्रात महिला अतिशय धडाडीने काम करीत आहेत. विकासाच्या प्रक्रियेत त्यांचा सहभाग अधिक वाढण्यासाठी प्रोत्साहन देण्याची गरज व्यक्‍त करून ना.विखे म्हणाले, कुटूंबाचा प्रपंच व्यवस्थितपणे हाताळणार्‍या महिलांकडूनच राजकारणाचा प्रपंचही यशस्वीपणे हाताळला जात आहे. येणार्‍या काळात महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने मतदारसंघातील या गावांमध्ये विधायक उपक्रम म्हणून महिलांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करणार आहे. तसेच मतदार संघातील पाणी पुरवठा योजनांचे काम येत्या काही दिवसात सुरु करण्यात येणार असून यासाठी पंतप्रधान पेयजल योजनेतून 225 कोटी रुपयांच्या मंजूर झालेल्या आराखड्यातून या योजनेसाठी निधी उपलब्ध करुन देण्याचे आश्‍वासन त्यांनी दिले.

डॉ.सुजय विखे  यांनी 26 गावांकरीता त्रिसुत्री कार्यक्रम हाती घेतल्याची घोषणा केली असून यामध्ये रेशनकार्ड मिळवून देण्याबरोबरच घरकुलांच्या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्याची ग्वाही दिली.
याप्रसंगी अध्यक्ष भास्करराव दिघे, अ‍ॅड.रोहीणी निघुते, दिलीप शिंदे यांची भाषणे झाली. प्राप्‍ताविक संजय कोल्हे यांनी केले तर आभार नानासाहेब दिघे यांनी मानले.