होमपेज › Ahamadnagar › पोलिस महानिरीक्षक कृष्णप्रकाश थिरकले ‘लुंगी डान्स’वर

पोलिस महानिरीक्षक कृष्णप्रकाश थिरकले ‘लुंगी डान्स’वर

Published On: Feb 12 2018 1:47AM | Last Updated: Feb 12 2018 1:47AMशिर्डी : प्रतिनिधी

शिर्डी येथे आयोजित आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेच्या समारोपप्रसंगी विशेष सुरक्षा विभागाचे पोलिस महानिरीक्षक कृष्णप्रकाश यांनी ‘डीजे’वरील ‘लुंगी डान्स’ या गाण्यावर ठेका धरला. त्यामुळे स्पर्धेतील धावपट्टू व उपस्थित आश्‍चर्यचकित झाले. त्यांचा हा ‘लुंगी डान्स’ चांगलाच चर्चेचा ठरला. 

शिर्डी येथे चॅम्प इंडोरन्सच्यावतीने रन फॉर साई म्हणून आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केली होती. सकाळी सहाला स्पर्धेस सुरुवात झाली. मॅरेथॉन स्पर्धा पूर्ण झाल्यानंतर समारोपाचा कार्यक्रम होता. यावेळी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांचे भाषण आटोपल्यानंतर ते व्यासपीठावरून निघून गेले. त्यानंतर थकलेल्या स्पर्धकांचा ताण हलका करून वातावरणात चैतन्य निर्माण करण्यासाठी आयोजकांनी ‘डीजे’वर गाणी सुरू केली.

त्यावेळी व्यासपीठावर प्रशिक्षित नृत्यकार गाण्यावर नृत्य करीत होते व प्रेक्षक त्याचा आनंद घेत होते. ‘लुंगी डान्स’ हे गाणे सुरु होताच तेथे उपस्थित असलेले विशेष पोलिस महानिरीक्षक कृष्णप्रकाश यांनी व्यासपीठावर धाव घेतली. त्यानंतर ‘लुंगी डान्स’वर नृत्यकारांसमवेत ठेका धरला. त्यांचा डान्स सुरू होताच उपस्थितांनी शिट्ट्या वाजवून दाद दिली. काही मिनिटे त्यांनी नृत्याचा चांगलाच आनंद लुटला. नृत्यानंतर स्पर्धकांची त्यांच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी एकच झुंबड उडाली. कृष्णप्रकाश यांच्या या डान्सवर उपस्थित आश्‍चर्यचकित झाले. कृष्णप्रकाश यांचा हा लुंगी डान्स चांगलाच चर्चेचा ठरला.