Fri, Feb 22, 2019 21:46होमपेज › Ahamadnagar › पोलिस उपनिरीक्षक, कॉन्स्टेबल निलंबित

पोलिस उपनिरीक्षक, कॉन्स्टेबल निलंबित

Published On: Feb 20 2018 1:21AM | Last Updated: Feb 19 2018 11:54PMनगर : प्रतिनिधी

कोपरगाव येथील कत्तलखान्यांना अभय दिल्याप्रकरणी कोपरगाव शहर पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक अर्चना करपुडे, कॉन्स्टेबल दीपक फुंदे या दोघांविरुद्ध निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. पोलिस अधीक्षक रंजन कुमार शर्मा यांनी ही कारवाई केली. यापूर्वी या प्रकरणात तीन कर्मचार्‍यांना निलंबित करण्यात आलेले होते. पोलिस अधीक्षकांच्या आदेशावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस पथकाने कोपरगाव शहरातील कत्तलखान्यांवर छापे टाकून तब्बल 89 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता. शहरात अनेक कत्तलखाने सुरू असताना त्यांच्याविरुद्ध कुठलीही कायदेशीर कारवाई न केल्याचा ठपका ठेवून पोलिस अधीक्षक शर्मा यांनी तातडीने पोलिस निरीक्षक दिलीप पारेकर यांची नियंत्रण कक्षात बदली करून त्यांच्या जागेवर दौलत जाधव यांची तात्पुरती नियुक्ती केली होती.

तसेच तीन कर्मचार्‍यांवर निलंबनाची कारवाई केली होती. चौकशीत आणखी एका पोलिस उपनिरीक्षक व कर्मचारी प्रथमदर्शनी दोषी असल्याचे आढळून आले. त्यावरून उपनिरीक्षक करपुडे व कॉन्स्टेबल फुंदे या दोघांनाही निलंबित करण्यात आले आहे. संबंधितांना शनिवारी (दि. 17) सायंकाळीच निलंबनाचे आदेश बजाविण्यात आलेले आहेत. या प्रकरणात एकूण 5 जणांविरुद्ध निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे. पोलिस उपअधीक्षक दर्जाच्या अधिकार्‍यामार्फत या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.