Sun, Apr 21, 2019 14:13होमपेज › Ahamadnagar › बोंडअळीने ३हजार १०० हे.क्षेत्र वाया

बोंडअळीने ३हजार १०० हे.क्षेत्र वाया

Published On: Dec 11 2017 1:27AM | Last Updated: Dec 10 2017 10:23PM

बुकमार्क करा

कोपरगाव : प्रतिनिधी

बोंडअळीचा प्रादुर्भाव कापसावर निर्माण झाला आहे. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी मेटाकुटीला आला आहे.  कोपरगाव तालुक्यात 3 हजार 100 हेक्टर म्हणजेच सुमारे 8 हजार एकर क्षेत्रांवरील कापूस पीक बोंड अळीने फस्त केले आहे. त्यामुळे सरकारने तातडीने शेतकर्‍यांना नुकसान भरपाई द्यावी, या मागणीने आता जोर धरला आहे. चालू वर्षीच्या सुरुवातीला मृग नक्षत्राचा पाऊस झाला. त्यानंतर पावसाने ओढ दिली. पाण्याचा ताण  बसल्याने कापूस पिकाची वाढ खुंंटली.

त्यानंतर परतीच्या पावसाने बर्‍यापैकी साथ दिली. पण त्यानंतर बोंडअळीचे भयानक संकट कपाशीवर आल्याने महागडी कीटकनाशके वापरूनही बोंड अळीचा समूळ नायनाट झाला नाही. त्यामुळे 3 हजार 100 हेक्टर क्षेत्रात सरासरी बारा क्विंटल कापसाचे उत्पादन अपेक्षित होते. तेथे ते अवघे तीन ते चार क्विंटलपर्यंतच उत्पादन निघत आहे. कापसाला सरासरी साडेचार हजार रुपये क्विंटल भाव गृहित धरला, तर तालुक्यातील शेतकर्‍यांचे सुमारे 16 कोटी 74 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. ते कशानेही भरून निघणार नाही. 

बीटी कापूस वाणाचे बियाणे बोगस आहे का? अशी शंकाही आता उत्पन्न झाली आहे. सर्व अस्मानी व सुलतानी संकटे शेतकरीच सहन करून जगाला अन्न पुरवितो, पण लाखाचा पोशिंदा आज उपाशी आहे. खरीप पिकांनाही पावसाने ओढ दिल्याने येथील शेतकर्‍यांना दुबार पेरणीच्या संकटाला सामोरे जावे लागले होते. 

परतीच्या पावसाने सोयाबीन, मका, बाजरी पिके काही प्रमाणात चांगली आली, पण त्याला भाव नसल्याने त्याचा खर्चही निघाला नाही. त्यातच कापसावर बोंड अळीचा प्रादूर्भाव झाल्याने शेतकर्‍यांची स्वप्ने धुळीस मिळाली आहे. बहुतांश शेतकर्‍यांची मुले, मुली महाविद्यालयीन, अभियांत्रिकी, तांत्रिक शिक्षण घेत आहेत. त्या अभ्यासक्रमांचे शैक्षणिक शुल्क कसे भरावे? हा प्रश्‍न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे.  शिवाय कर्जमाफीच्या रक्कमाही शेतकर्‍यांच्या खात्यावर अजून जमा झाल्या नाहीत.  परिणामी रब्बी पीक व ऊसलागवड धोक्यात आली आहे. 

एकंदरीतच शेतकरी आर्थिक संकटात सापडल्याने सरकारने हिवाळी अधिवेशनात याबाबत लवचिक धोरण स्वीकारून सरसकट सर्वच कापूस उत्पादक शेतकर्‍यांना नुकसान भरपाई जाहीर करून त्याचे पैसे शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा करावेत, असा सूर शेतकर्‍यांचा आहे.  आ. स्नेहलता कोल्हे यांनी कृषिमंत्री व जिल्हा कृषी अधिकारी यांच्याकडे याबाबत कैफियत मांडून शेतकर्‍यांच्या नुकसानीचे पंचनामे सुरू केले आहेत. याला नुकसान भरपाई मिळावी, यासाठी त्यांचा पाठपुरावा सुरू आहे.