होमपेज › Ahamadnagar › प्रांतांच्या पथकावर वाळूतस्करांचा हल्ला

प्रांतांच्या पथकावर वाळूतस्करांचा हल्ला

Published On: Feb 14 2018 2:49AM | Last Updated: Feb 13 2018 11:53PMकोपरगाव : प्रतिनिधी

वारी शिवारात गोदावरी नदीपात्रातून अवैधरित्या वाळू भरून चाललेल्या डंपरचा पाठलाग करणार्‍या प्रांताधिकार्‍यांसह पाचजणांच्या पथकावर वाळूतस्करांनी लाकडी दांडक्याने हल्ला चढवून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना मंगळवारी पहाटे घडली. उपविभागीय दंडाधिकारी योगेश पालवे व तलाठी जयवंत जाधव हे दोघे जखमी झाले. तर वाळूतस्करांनी डंपर घेऊन पलायन केले. 

उपविभागीय अधिकारी पालवे यांच्या फिर्यादीवरून तालुक्यातून तडीपार असलेला किरण हजारे (रा.कोकमठाण) व त्याचा साथीदार देवा खंडिझोडसह सात ते आठ जणांवर शासकीय कामात अडथळा आणणे, जीवे  मारण्याचा प्रयत्न, दरोडा घालणे, जमाव जमविणे आदी कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत पोलिस निरीक्षक साहेबराव कडनोर यांनी दिलेली माहिती अशी की, शिर्डीचे उपविभागीय अधिकारी रवींद्र ठाकरे यांच्या आदेशानुसार तालुक्यातील हद्दीत अवैध वाळू वाहतूक करणार्‍या वाहनांवर कायदेशीर कारवाई करण्याकरिता अव्वल कारकून योगेश पालवे, तलाठी जयवंत जाधव, लिपिक भाऊसाहेब कोंडाजी शेळके, कोतवाल विठ्ठल बनकर, चालक आदेश पावलास जावळे हे शासकीय वाहनातून (क्र. एमएच17 -एएन55) गेले होते.

ते सकाळी वारी गावातील खंडोबा मंदिराजवळ आले असताना, एक वाळूने भरलेला डंपर (क्र. एमएच15-सीके8407) आढळून आला. पालवे व सोबतच्या कर्मचार्‍यांनी वाळूच्या डंपरला थांबविण्याचा प्रयत्न केला असता, त्यावरील चालकाने जीवे  मारण्याच्या उद्देशाने डंपर त्यांच्या अंगावर घातला. मात्र, तेथून बाजूला झाल्याने त्यांचा जीव वाचला. त्याचवेळी पांढर्‍या रंगाच्या कारमधून आलेल्या किरण हजारे, देवा खंडिझोड व इतर सात ते आठ अनोळखी लोकांनी खंडोबा मंदिरात दर्शनसाठी आलेल्या व रस्त्यावर फिरणार्‍या लोकांना ओरडून मध्ये न पडण्याची धमकी दिली. जर मध्ये पडले, तर एकेकाला पाहून घेण्याची धमकी दिली.

त्यांच्या दहशतीला व धमकीला घाबरून परिसरातील लोक तेथून पळून गेले. त्यानंतर पथकाने पळून जाणार्‍या डंपरचा पाठलाग करून वारी बाप्तारा शिव रस्त्यावरील चौफुलीजवळ तो थांबविला. डंपर ताब्यात घेत असताना किरण हजारे, देवा खंडिझोड व त्यांच्या साथीदारांनी हातात लाकडे दांडके घेऊन उगीच मॅटर वाढवू नका, गाडी सोडून द्या, असे म्हणत पथकाला जीवे मारण्याची धमकी दिली. त्यांच्या साथीदारांनी लाकडी दांडक्याने पालवे व तलाठी जाधव यांना पाठीवर व हातावर जबर मारहाण केली.

गाडीतील इतरांना शिवीगाळ करून धक्काबुक्की केली. किरण हजारे याने पालवे यांच्या खिशातून दोन हजार चारशे रुपये जबरदस्तीने काढून घेतले. त्याच्या इतर साथीदारांनी शासकीय वाहनाच्या काचा दांडक्याने फोडल्या. यावेळी वाळूतस्करांनी सुमारे 5 लाख 10 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. यातील जखमी पालवे व जाधव यांच्यावर कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.