Thu, Jul 18, 2019 06:57होमपेज › Ahamadnagar › कोपरगावला निळवंडेचे पाणी देणारच 

कोपरगावला निळवंडेचे पाणी देणारच 

Published On: Jun 22 2018 2:09AM | Last Updated: Jun 21 2018 10:39PMकोपरगाव : प्रतिनिधी

पाणी ही राष्ट्राची संपत्ती आहे. निळवंडे धरणांतील पाणी ही देखील सर्वांची संपत्ती आहे. त्यावर सर्वांचा हक्क आहेफ याच भूमिकेतून कोपरगाव शहराला पिण्याचे पाणी हे शासन देणारच आहे, तुम्ही काळजी करू नका, असे प्रतिपादन विधानसभेचे सभापती हरिभाऊ बागडे यांनी केले. 

संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष व साईबाबा संस्थानचे विश्‍वस्त बिपीन कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त काल संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टीट्युट कार्यस्थळावर सभापती हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते आपत्ती निवारण पथकाचे उदघाटन करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजीमंत्री शंकरराव कोल्हे होते. याप्रसंगी व्यासपिठावर प.पू. रमेशगिरी महाराज, ज्येष्ठनेते दत्तात्रय कोल्हे, माजी खासदार भाउसाहेब वाकचौरे उपनगराध्यक्ष विजय वाजे, शिर्डी नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा योगिता शेळके, माजी नगराध्यक्ष अभय शेळके उपस्थित होते.

आमदार स्नेहलता कोल्हे, कोपरगाव औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष विवेक कोल्हे व संजीवनी फाउंडेशनचे सुमित कोल्हे, संजीवनीचे उपाध्यक्ष सेापानराव पानगव्हाणे, कार्यकारी संचालक जीवाजीराव मोहिते व त्यांच्या सहकार्‍यांनी उपस्थितांचे स्वागत केले. बागडे म्हणाले, माजीमंत्री शंकरराव कोल्हे हे सहकार व पाण्याच्या अभ्यासाचे तज्ज्ञ असून मतदार संघासाठी केलेले कार्य उल्लेखनीय आहे. 1966 पासून त्यांचा व माझा संबंध आहे. ग्रामीण भागातील युवक देश-विदेशात पुढे गेला पाहिजे. यासाठी त्यांनी संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून जी शैक्षणिक चळवळ उभी केली ती देशपातळीवर अतुलनीय आहे. संजीवनीचे नाव या क्षेत्रात आवर्जुन घेतले जाते. आज वडीलोपार्जित जमिनीचे तुकडे तुकडे होत गेल्याने कुटूंबातील सदस्यांना परिसरातील नागरिकांना दर्जेदार शिक्षण हाच एकमेव पर्याय असल्याने माजीमंत्री कोल्हे यांनी काळाची पावले ओळखून ही चळवळ पुढे सुरू ठेवली. सहकाराच्या माध्यमातून शेतकर्‍याला घडविले तालुक्यातील विविध आपत्तीजन्य परिस्थिती कोल्हे कुटूंबिय सर्वांना बरोबर घेऊन निवारण करतात. यातून नवीन पिढी उभारण्यासाठी कोल्हे कुटूंबिय सतत कार्यरत असल्याचे दिसून येते. कार्यकर्ता बनविणे व तो टिकविणे ही कला या कुटूंबाला अवगत आहे. 

सत्काराला उत्तर देताना संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीनराव कोल्हे म्हणाले, ब्रिटीश काळापासून कोपरगाव तालुका अवर्षणग्रस्त असून त्याला बारमाही गोदावरी कालव्यांची निर्मिती करून पाटपाणी दिले. मात्र त्यास कायमस्वरूपी पाणी कसे मिळेल यावर युती शासनाने भर द्यावा. निळवंडे धरणातून शिर्डी व कोपरगावला पिण्याचे पाणी देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करून त्याचा शासन अध्यादेश काढून कृतीही केली. मात्र विघ्नसंतोषी पाईपलाईनमधील शुक्राचार्य हे त्यास अडथळा आणत आहेत. त्यांना सुबुध्दी देवो व कोपरगावला पिण्याचे पाणी मिळो, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. 

आ. स्नेहलता कोल्हे याप्रसंगी म्हणाल्या की, कोपरगाव शहर व मतदारसंघाचा पिण्याचा व शेतीच्या पाण्याचा प्रश्‍न सुटावा म्हणूनच माजीमंत्री शंकरराव कोल्हे यांनी पक्ष बदलला. 2014 च्या निवडणुकीत आपल्याला पक्ष नवा होता. तरीही कार्यकर्त्यांनी मोलाची साथ दिल्यामुळेच आपल्याला लोकप्रतिनिधीपदाची संधी मिळाली. निळवंडे धरण कालवे प्रश्‍नी शेतकर्‍यांवर अन्याय न होऊ देता राखीव पिण्याच्या पाण्यातूनच शिर्डी कोपरगावला पिण्याचे पाणी घेत आहेत. मात्र, त्याबाबत काही जणांनी विविध वावडया उठवून त्याला विरोध करीत आहेत तो निरर्थक आहे. युती शासनांच्या माध्यमांतून दहा वर्षातील विकासाचा बॅकलॉग आपण भरून काढला आहे. प्रारंभी प्रशासकीय व्यवस्थापक प्रकाश डुंबरे यांनी आपत्ती निवारण पथकाबाबत माहिती दिली.