Sun, Mar 24, 2019 06:22होमपेज › Ahamadnagar › प्रेयसीचा खून करून रेल्वेखाली आत्महत्या

प्रेयसीचा खून करून रेल्वेखाली आत्महत्या

Published On: Dec 03 2017 1:10AM | Last Updated: Dec 02 2017 11:36PM

बुकमार्क करा

कोपरगाव : प्रतिनिधी

दारूच्या नशेत असलेल्या प्रियकराने आपल्या प्रेयसीवर बलात्कार करून, तिचा दगडाने ठेचून खून केला. त्यानंतर त्याने स्वतः रेल्वेखाली आत्महत्या केल्याची घटना  तालुक्यातील दशरथवाडी-संवत्सर  शिवारात घडली.  शहर पोलिस ठाण्यात मुलीच्या आईने फिर्याद दिली असून, या घटनेमुळे खळबळ उडाली. संदीप संजय कांबळे (35, रा. शिवाजीनगर, दहेगाव बोलका) असे आरोपीचे नाव आहे.
श्रीरामपूर उपविभागीय पोलिस अधिकारी रोहिदास पवार, पोलिस निरीक्षक बी. बी. पारेकर, महिला पोलिस निरीक्षक अर्चना करपुडे यांनी घटनास्थळी भेट दिली आहे. आरोपीने खून करून मुंबई-नागपूर महामार्गावर असलेल्या संवत्सर रेल्वे रुळावर जाऊन आत्महत्या केली. याबाबत पोलिसांनी घटनास्थळावरून दगड, तेथील मातीचे नमुने जप्त केले आहेत.

दरम्यान मोहम्मद मकसूद आलम (रेल्वे गँगमन, संवस्तर) यांनी पोलिसात खबर दिली. शनिवारी पहाटे चार ते साडेचारच्या दरम्यान संवस्तर रेल्वे पुलाखाली डोक्यास जबर मार लागून कांबळे हा जागीच ठार झाल्याचे म्हटले आहे. पोलिसांनी याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.  या घटनेचा तपास महिला पोलिस निरीक्षक अर्चना करपुडे यांच्याकडे असून, त्यांनी सांगितले की, ही मुलगी व आरोपी संदीप हे दोघेही घटना होण्याच्या आधी पूर्णपणे दारूच्या नशेत होते. ते दोघे रात्री संवस्तर पुलावर हिंडत होते. त्यांना बर्‍याच गावकर्‍यांनी फिरताना पाहिले होते.

याबाबत नव्यानेच येथे रुजू झालेले पोलिस निरीक्षक डी. बी. पारेकर यांनी सांगितले की, आत्महत्या केलेला आरोपी व खून झालेली मुलगी गरीब घरातील असून, त्या दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले. तेथे दोन्ही कुटुंबीयांच्या सदस्यांनी व गावकर्‍यांनी गर्दी केली होती. दरम्यान, ग्रामीण रुग्णालायाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. कुंदन गायकवाड यांनी दोघांचे शवविच्छेदन येथे होणार नाही. त्यांना घाटी रुग्णालय औरंगाबाद येथे पाठवावे लागेल असे सांगितले. रात्री उशिरापर्यंत शवविच्छेदन झाले नव्हते. डॉ. गायकवाड यांनी पोलीस निरीक्षक पारेकर यांना शासनाचे अध्यादेश दाखवून त्यांची बोळवण केली.