Wed, Jul 08, 2020 03:27होमपेज › Ahamadnagar › कपूर यांच्या निधनाने कोपरगावकर गहिवरले

कपूर यांच्या निधनाने कोपरगावकर गहिवरले

Published On: Dec 06 2017 1:46AM | Last Updated: Dec 06 2017 1:00AM

बुकमार्क करा

कोपरगाव : प्रतिनिधी

राजबिंडा, देखणा, रुबाबदार व्यक्तिमत्त्व असलेले अभिनेते शशी कपूर यांच्या निधनाने कोपरगाव भेटीच्या आठवणी आज पुन्हा ताज्या झाल्या. त्यांच्या आठवणींना उजाळा देऊन श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. सद्गुरू गंगागीर महाराज महाविद्यालयात दि. 3 फेब्रुवारी 1985 रोजी अभिनेते शशिकपूर स्नेहसंमेलनासाठी प्रमुख पाहुणे आणण्यासाठी युवक बिरादरीचे संस्थापक अध्यक्ष कृष्णकांत कुदळे, तसेच माजी नगराध्यक्ष पद्मकांत कुदळे, तत्कालिन प्राचार्य शिवाजीराव  भोर, कै. म्हाळूशेठ आव्हाड आदींनी विशेष प्रयत्न केले होते. कपूर यांनी स्नेहसंमेलनात जवळपास तीन तास हजेरी लावली होती. बहारदार हिंदी शैलीतून त्यांनी संवादफेक करीत विद्यार्थी व विद्यार्थिनींशी हितगूज केले होते.

हा कार्यक्रम संस्मरणीय ठरला होता. तत्कालिन खेळाडू व महाविद्यालयाचे अमीन सयानी म्हणून ओळख असलेले अरुण चंद्रे, या भागाचे सिनेअभिनेते चंद्रकांत शिंदे, माजी विद्यापीठ प्रतिनिधी सुनील बोरा, एस. पी. कुलकर्णी, दिलीप अरगडे, राजेंद्र पाचपुते आदी विद्यार्थांचा त्यांनी विशेष गौरव करून सत्कार केला होता. त्याची छायाचित्रे आजही त्या घटनेची साक्ष देतात. त्यांच्या निधनाने हे सर्व विद्यार्थी आज गहिवरले होते. कोपरगावच्या निवारा सोसायटीस कपूर यांनी कोयटे यांच्या पुढाकाराने भेट दिली होती. त्यावेळी शहरात नव्यानेच हा प्रकल्प राबविला जात होता. त्या प्रकल्पाचे कपूर यांनी तोंड भरून स्तुती केली होती. साईभक्त असलेल्या शशीकपूर यांच्या मेरे पास माँ है म्हणून आईचे महत्व सांगणार्‍या या सुंदर दिलखुलास व्यक्तिमत्वाच्या आठवणींनी कोयटे कुटूंबीय गहिवरले होते.