होमपेज › Ahamadnagar › कोपरगाव रस्त्याला कायम साडेसाती

कोपरगाव रस्त्याला कायम साडेसाती

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पुणतांबा : वार्ताहर

कोपरगाव रस्त्याचे काम काही ठिकाणी दोन वर्षांनंतरही अर्धवट असल्याने वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. कोपरगाव रस्त्याला लागलेली साडेसाती केव्हा संपणार? असा सवाल सार्वजनिक बांधकाम विभागाला पुणतांबेकरांकडून विचारला जात आहे. मंजूर असूनही रखडलेले काम आठ दिवसांत सुरू न झाल्यास रास्तारोको आंदोलन करण्याचा इशारा माजी जि.प. सदस्य डॉ. धनंजय धनवटे यांनी दिला.

पुणतांबा-कोपरगाव रस्ता दुरुस्तीसाठी गेल्या आठ-दहा वर्षांपासून विविध पक्ष, तसेच संघटनांनी अनेकदा आंदोलने केली. दहा वर्षांसून या प्रश्‍नावर केवळ आश्‍वासने मिळत होती. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे, आ. स्नेहलता कोल्हे यांच्या प्रयत्नांतून सुमारे पावणे दोन कोटी रुपये खर्च करून पुणतांबाकडून 7 कि.मी. रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. 

पुणतांब्याजवळ आठशे मीटर खडीकरणाचे काम दोन वर्षांपूर्वी एका ठेकेदाराने पूर्ण केले. मात्र, या कामावर कारपेटचे कामच अद्यापि केलेले नसल्याने रस्त्यावर खड्डे पडले आहेत. वाहनधारकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

याबाबत कोपरगाव बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांकडे विचारणा केली असता, संबंधित अधिकारी वर्षापासून वेगळेवेगळे कारणे सांगून ठेकेदाराला पाठीशी घालत असल्याने ग्रामस्थांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

शिंगव्याच्या पुढेही हा रस्ता खड्ड्यांमुळे खराब झाला असून काही अंतराच्या रस्ता कामास मंजुरी असून पडलेल्या खडीची माती झाली असताना काम सुरू होत नसल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. आ. कोल्हे यांनी येथे गेल्या महिन्यात कोपरगाव रस्त्याचे काम सुरू होणार असल्याचे सांगितले होते. 

मात्र, सा.बां.चे अधिकारी काम का सुरू करीत नाही? असा सवाल उपस्थित केला जात आहे. शिर्डीत उत्सवकाळात नगर-मनमाड मार्गवरील जड वाहतूक पुणतांबामार्गे वळविली जाते. यामुळे या रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करावे, अन्यथा कोणतीही पूर्वसूचना न देता रास्तारोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा डॉ. धनवटे यांनी दिला.