Wed, Apr 24, 2019 19:56होमपेज › Ahamadnagar › दरोडेखोरांच्या गोळीबारात सराफ ठार

दरोडेखोरांच्या गोळीबारात सराफ ठार

Published On: Aug 20 2018 1:35AM | Last Updated: Aug 20 2018 12:58AMकोपरगाव : प्रतिनिधी

तालुक्यातील कोळपेवाडी येथील मुख्य रस्त्यावर असलेल्या लक्ष्मी ज्वेलर्स या सराफी दुकानावर गोळीबार करीत, सात ते आठ दरोडेखोरांच्या टोळीने रविवारी (दि.19) रात्री साडेसात ते पावणेआठच्या दरम्यान दरोडा टाकला. यावेळी दरोडेखोरांनी केलेल्या गोळीबारात दुकानाचे मालक शाम सुभाष घाडगे (36) यांचा जागीच मृत्यू झाला. तर गणेश विठ्ठल घाडगे(42) हे गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

दुकानातील लाखो रुपयांचा सोने-चांदीचा ऐवज दरोडेखोरांनी लुटून पोबारा केला आहे. लक्ष्मी ज्वेलर्स या दुकानाच्या नूतनीकरणाचे काम सुरू होते. रविवारी रात्री साडेसात ते पावणेआठच्या सुमारास तेथे आलेल्या सात ते आठ अज्ञात दरोडेखोरांनी गोळीबार केला. त्यामध्ये शाम घाडगे यांच्या छातीत व पोटात गोळ्या घुसल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर गणेश घाडगे यांच्याही पोटात गोळी घुसलेली असल्याने त्यांना तातडीने कोपरगाव येथ एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना नाशिकला हलविण्यात आले आहे. 

दरम्यान, दरोडेखोरांनी डोक्याला बंदूक लावून केलेल्या मारहाणीत सुभाष घाडगे हेही किरकोळ जखमी झाले आहेत. घटनेनंतर बर्‍याच कालावधी नंतर पोलिस घटनास्थळी पोहचले.पोलिसांना घटनास्थळी बंदुकीतून झाडलेल्या फैरीची काडतुसे मिळून आली आहेत. मात्र, पोलिसांकडून त्यास अधिकृत दुजोरा देण्यात आला नाही. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच आ. स्नेहलता कोल्हे यांनी जखमी घाटगे यांना रुग्णालयात हलविण्यासाठी तातडीने रुग्णवाहिका उपलब्ध करून मदत केली. मयत घाडगे यांच्या मृतदेहावर कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनाचे काम सुरू होते. घटनास्थळी शिर्डीचे पोलिस उपअधीक्षक व फौजफाटा होता. धारणगाव रस्त्यावरील खासगी रुग्णालयात बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. 

या थरारक घटनेमुळे तालुक्यात मोठी दहशत पसरली आहे. 2006 साली कोपरगाव शहारात बाजारतळ भागात काल्या नांगर्‍याच्या टोळीने अशाच पद्धतीने दरोडा टाकला होता. सायंकाळी साडेसहा वाजता तीन सराफी दुकानांसमोर फटाके फोडत, दगडफेक करीत सुमारे 10 ते 15 लाख रुपयांचा ऐवज लुटण्यात आला होता. अशाच पद्धतीने कोळपेवाडी येथे हा प्रकार घडला आहे.