Sun, Jun 16, 2019 12:25
    ब्रेकिंग    होमपेज › Ahamadnagar › कोपर्डीची काळीकुट्ट घटना!

कोपर्डीची काळीकुट्ट घटना!

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

अवघ्या नववीत शिकत असलेल्या कोपर्डीच्या ‘निर्भया’वर गावातीलच तिघांनी अत्याचार केले. अत्याचारांमुळे एक उमलती कळी कुस्करली गेली. आरोपींच्या अत्याचारांना बळी पडलेल्या निरागस ‘निर्भया’ची आठवण आजही संपूर्ण देशाला होत आहे... 

कर्जत-श्रीगोंदा रस्त्यापासून 5 कि.मी. अंतरावर असलेलं कोपर्डी हे गाव... मागील वर्षीच्या जुलै महिन्याची 13 तारीख... सायंकाळची वेळ... छोटंसं पत्र्याचं असलेलं निर्भयाचं घर गावापासून थोड्याशाच अंतरावर... जवळच असलेल्या आजोबांच्या घरी सायकलवरून साहित्य आणण्यास एक उत्कृष्ट कबड्डी खेळाडू असलेली ‘निर्भया’ गेली ती अखेरचीच. आरोपींनी तिच्यावर अनन्वित अत्याचार करीत, तिचा निर्घृण खून केला... अचानक घडलेल्या या दुर्दैवी घटनेने मानवी मन शहारले. राज्यातच नव्हे, तर देशातही एकच संतापाची लाट या घटनेने पसरली. घटना होऊन आता सोळा महिन्यांचा कालावधी लोटलाय. मात्र, ही दुर्दैवी घटना घडलेल्या परिसरातील प्रत्येक वस्तू निर्भयाची आठवण करून देते. कितीही पाषाणहृदयी माणूस असला, तरी येथे आल्यावर त्यालाही पाझर फुटतोच. घटनेची कल्पना करताच मनाचा कोपरा भावनिक होतो. निर्भया आपल्याला विचारतेय, ‘माझा अपराध तो काय? माझ्या वाट्याला हे असं जगणं का आलं... हे सुंदर जग मलाही पाहायचं होतं, अनुभवायचं होतं... मात्र तसं झालं नाही... नियतीनं माझ्यावर अन्याय केला... मात्र येवढं सगळं होऊनही मला अद्याप न्याय का मिळाला नाही...

निर्भयाच्या या प्रश्‍नांचं उत्तर मात्र या ठिकाणी येणार्‍यांकडे नसतं. जो येतो तो नि:शब्द होत त्या अत्याचाराचा मनोमन निषेध करून परत निघतो तो मनात निर्भयाला न्याय मिळायची अपेक्षा ठेवूनच. या घटनेनंतर पीडित कुटुंब व गावामध्ये कोणताच सण साजरा केला गेला नाही. जेव्हा ‘निर्भया’वर अत्याचार करत तिची निर्घृण हत्या करणार्‍या तिन्ही आरोपींना फाशी होईल, तेव्हाच सण साजरा करण्याचा निर्धार गावकरी व्यक्त करतात. माझी ‘निर्भया’ दिसली का हो... ती मला बोलावते आहे... साहेब, तिचा आवाज आजही मला ऐकू येतो... असं म्हणत ‘निर्भया’चे दुर्दैवी आई-वडील अश्रूंना वाट करून देतात... सोळा महिन्यांनंतरही पीडित कुटुंबाचा एकही क्षण निर्भयाच्या आठवणीशिवाय जात नाही... ‘निर्भया’चं तिच्या घरातच छोटं मंदिर तयार करण्यात आलंय. ‘आमच्या फोटोला तिने हार घालण्याची गरज होती, त्याऐवजी आम्हालाच त्या लेकराच्या फोटोला हार घालावा लागतो,’ असे या दुर्दैवी माऊलीचे बोल आहेत. 

घटनाक्रम

सन 2016
13 जुलै : सायंकाळी कोपर्डीतील शाळकरी विद्यार्थिनीचा शारीरिक अत्याचारानंतर अमानुष खून.
14 जुलै : (दि. 13 च्या मध्यरात्री 12.02 वाजता) पीडितेच्या भावाची कर्जत पोलिस ठाण्यात फिर्याद. बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण, बलात्कार, खुनाचा गुन्हा दाखल.
15 जुलै : मुख्य आरोपी पप्पू ऊर्फ जितेंद्र शिंदे याला श्रीगोंद्यातून सकाळी अटक.
16 जुलै : गुन्ह्यास अपप्रेरणा दिल्याप्रकरणी आरोपी संतोष भवाळ याला अटक.
18 जुलै : गुन्ह्यास अपप्रेरणा दिल्याप्रकरणी नितीन भैलुमे याला अटक. सामाजिक संघटनांची आंदोलने व वाढत्या सामाजिक दबावामुळे गुन्ह्याचा
तपास ‘एलसीबी’कडे वर्ग. पोलिस निरीक्षक शशिराज पाटोळे यांच्याकडे तपासाची सूत्रे. कोपर्डीत मान्यवरांच्या भेटी, आंदोलने यात स्थानिक पोलिसांसह जिल्हा पोलिस प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी व्यस्त असल्याने पाटोळे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाकडून पूर्णवेळ तपास सुरू. तत्कालीन पोलिस अधीक्षक डॉ. सौरभ त्रिपाठी यांच्याकडून दररोज तपासाचा आढावा.
कोपर्डी गावाला पोलिस छावणीचे स्वरूप.

परिसरातील शाळकरी मुलींमध्ये दहशत. मुख्यमंत्र्यांच्या आदेशावरून पुण्याच्या पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला कोपर्डीत दाखल. युवतींचे समुपदेशन करून दिला धीर. 

27 जुलै : विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीची व खटला जलदगती न्यायालयात चालविण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांची घोषणा.
प्रयोगशाळेतील चाचण्यांचे अहवाल मुख्य आरोपी पप्पू ऊर्फ जितेंद्र शिंदे याची अंतर्वस्त्रे, पँटवर पीडितेच्या ‘डीएनए’चे अंश. नखे, पीडितेच्या अंगावरील चावे आरोपी शिंदे यानेच घेतल्याचे वैद्यकीय अहवालात निष्पन्न. आरोपींच्या मुंबईतील प्रयोगशाळेत मानसशास्त्रीय चाचण्या.

साक्षीदारांचे जबाब

पीडितेचा शोध घेण्यासाठी गेलेला तिचा चुलत भाऊ म्हणजेच फिर्यादीचा मुख्य आरोपी शिंदे याला पाहिल्याचा जबाब. फिर्यादीसह पीडित मुलीची आई, चुलत बहीण व रस्त्याने दुचाकीवरून जाणारे तीनजण असे एकूण 6 प्रत्यक्षदर्शी साक्षीदार. प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांसह नातेवाईक, तिच्या मैत्रिणी, वर्गातील विद्यार्थी, वर्गशिक्षक असे एकूण 30-32 जणांचे जबाब पोलिसांनी नोंदविले. घटनेपूर्वी काही दिवस आधी पप्पू शिंदे याच्याकडून तिची छेडछाड केल्याचे व त्याच्यासोबत इतर दोन आरोपींनी त्याला अपप्रेरणा दिली: जबाबांतून पोलिसांचा निष्कर्ष. - गावात कायमस्वरूपी पोलिस चौकी सुरू.

सप्टेंबर : विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीचा आदेश.
7 ऑक्टोबर : तीन आरोपींविरुद्ध तपासी अधिकारी पाटोळे यांच्याकडून नगर येथील न्यायालयात दोषारोपपत्र दाखल.पोलिसांनी ठेवलेला दोषारोप : आरोपी नंबर 1: पप्पू ऊर्फ जितेंद्र शिंदे याच्याकडून अल्पवयीन मुलीचा अत्याचारासह खून. आरोपी नंबर 2 व 3 : संतोष भवाळ व नितीन भैलुमे यांच्याकडून गुन्ह्यास अपप्रेरणा.
18 ऑक्टोबर : विशेष सत्र न्यायाधीश सुवर्णा केवले यांच्यासमोर खटल्याची नियमित सुनावणी सुरू. विशेष सरकारी वकील म्हणून निकम यांची हजेरी. वकिलांच्या बहिष्कारामुळे मुख्य आरोपी शिंदेचे वकीलपत्र कोणीही घेतले नाही. आरोपी संतोष भवाळ याचे वकीलपत्र बाळासाहेब खोपडे यांच्याकडे. भैलुमेचे वकीलपत्र प्रकाश आहेर यांच्याकडे. मुख्य आरोपी शिंदे याला वकील देण्याची न्यायालयाची विधी सेवा प्राधिकरणाला सूचना. रात्री उशिरा प्राधिकरणाच्या बैठकीत योहान मकासरे यांच्या नियुक्तीचा निर्णय.
ऑक्टोबर 2016 ते मे 2017 न्यायालयीन कामकाज सरकार पक्षाकडून न्यायालयात 18 साक्षीदार, तपासी अधिकारी, आरोपींची नोंदविली साक्ष. आतापर्यंत खटल्यात अंदाजे 50 दिवसांचे कामकाज पूर्ण.

सन 2017
22 जून : मुख्य आरोपीच्या वकिलांकडून बचावासाठी एकाही साक्षीची मागणी नाही. भवाळ याच्या वकिलांकडून सरकारी वकील निकमांसह 6 जणांची साक्ष नोंदविण्याची मागणी.
23 जून : आरोपी भैलुमेच्या वकिलांकडून मुख्यमंत्र्यांसह पत्रकाराच्या साक्षीसाठी अर्ज.
7 जुलै : आरोपी भैलुमेच्या वकिलांनी 23 जूनचा अर्ज घेतला मागे.
26 ऑक्टोबर : विशेष सरकारी वकील अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांचा अंतिम युक्तिवाद सुरू.
28 ऑक्टोबर : आरोपींच्या वकिलांचा अंतिम युक्तिवाद सुरू.
9 नोव्हेंबर : आरोपींच्या वकिलांचा तोंडी युक्तिवाद पूर्ण.
13 नोव्हेंबर : अ‍ॅड. योहान मकासरे यांच्याकडून 189 पानांचा लेखी युक्तिवाद दाखल.
18 नोव्हेंबर : आरोपींना ठरविले दोषी.